दिव्यांग व्यक्तींसोबत चर्चासत्राचे आयोजन
लातूर - जिल्हा विधि सेवा प्राधिकरणच्या वतीने न्यायालयाच्या परिसरात दिव्यांग व्यक्तीसोबत प्रेरणादायी चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्राधिकरण सचिव तथा न्या. सुनीता कंकनवाडी, मनपा आयुक्त देविदास टेकाळे, समाजकल्याण विभागाचे कुंभार, उपायुक्त शशीमोहन नंदा, ॲड. अजय कलशेट्टी, ॲड. सुरेश सलगरे, ॲड. सुनयना बायस, पृथ्वीसिंग बायस, प्रहार संघटनेचे अध्यक्ष नितीन देशमुख आदींसह दिव्यांग बांधवांची उपस्थिती होती.
बालाजी जाधव यांचा लातुरात सत्कार
लातूर - रक्तदान हे जीवनदान म्हणून सामाजिक कार्य करणाऱ्या राजमाता बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष बालाजी जाधव यांचा जेएसपीएम संस्थेचे अध्यक्ष माजी आ. शिवाजीराव पाटील कव्हेकर, नगरसेवक अजितसिंह पाटील कव्हेकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. गेल्या अनेक दिवसांपासून सामाजिक माध्यमांतून रक्तदान चळवळीला बालाजी जाधव यांनी प्रोत्साहन दिले आहे.
ऊस लागवडीचे क्षेत्र वाढले
लातूर - जिल्ह्यात यंदा समाधानकारक पाऊस झाला असल्याने पाणी पातळीत वाढ झाली आहे. त्यामुळे ऊस लागवडीकडे शेतकऱ्यांचा अधिक कल आहे. लातूर तालुक्यातील तांदुळजा, सारसा, जेवळी, साई, नागझरी, हरंगुळ आदी गावांत उसाचे क्षेत्र वाढले आहे. यंदा शेतकऱ्यांनी ठिबक सिंचनाला अधिक भर दिला आहे.
जिल्ह्यात ३९ रुग्ण ऑक्सिजनवर
लातूर - जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत घट होत आहे. आतापर्यंत २२ हजार ६४४ बाधित रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी २१ हजार ५८० जणांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या ३९७ जणांवर उपचार सुरू असून, यापैकी १५८ जण रुग्ण होम आयसोलेशनमध्ये उपचार घेत आहेत. जिल्ह्यात चार रुग्ण व्हेंटिलेटरवर असून, ३९ रुग्ण ऑक्सिजनवर असल्याचे आरोग्य विभागाच्या वतीने सांगण्यात आले.
महावितरणची ‘एक गाव-एकदिवस’ मोहीम
लातूर - वीज ग्राहकांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी महावितरणच्या वतीने ‘एक गाव-एक दिवस’ मोहीम राबविली जात आहे. या अंतर्गत निवड केलेल्या गावातील नागरिकांच्या समस्यांचे निराकरण केले जाते. तसेच विद्युत रोहित्र बदलणे, मीटर दुरुस्त करून देणे, नादुरुस्त पोल दुरुस्त करणे यासह विविध कामे केली जातात. जिल्ह्यातील रेणापूर आणि उदगीर तालुक्यातील सर्वाधिक कामे झाली आहेत. पथकामध्ये एक अभियंता तसेच विद्युत कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. या मोहिमेला जिल्ह्यात चांगला प्रतिसाद मिळत आहे.
अतिवृष्टी मदतीपासून शेतकरी वंचित
लातूर - जिल्ह्यात खरीप हंगामाच्या शेवटी परतीच्या पावसाने हजेरी लावली. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. प्रशासनाच्या वतीने पंचनामे करण्यात आले. मात्र अद्यापही बहुतांश शेतकरी मदतीपासून वंचित आहेत. पहिल्या टप्प्यातील अनुदान वितरीत करण्यात आले असून, दुसऱ्या टप्प्यातील अनुदान प्रशासनाला प्राप्त झाले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना मदतीची प्रतीक्षा लागली आहे.
डी.ए.मोरे यांनी स्वीकारला पदभार
लातूर - जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागाच्या शिक्षणाधिकारीपदी डी.ए. मोरे यांनी पदभार स्वीकारला. त्यांनी पालकमंत्री अमित देशमुख यांची भेट घेतली. यावेळी जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष प्रकाश देशमुख, वसंतराव पाटील, प्रा. बाबुराव जाधव, जब्बार सगरे यांची उपस्थिती होती. औदुंबर उकिरडे यांची पुणे येथे शिक्षण उपसंचालकपदी नियुक्ती झाली असल्याने डी.ए. मोरे यांनी शिक्षणाधिकारी पदाचा पदभार स्वीकारला आहे.