दोन वर्षांपासून मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत ६ कोटी ५० लाख रुपये खर्चून राज्य मार्ग क्रमांक ६८ ते रोहिदासनगर-बिरवली हा दहा किलोमीटरचा रस्ता तयार करण्यात येत आहे. हा रस्ता तयार करण्याचा कालावधी संपला होता. मात्र कोरोनामुळे कालावधी वाढविण्यात आला आहे. रस्त्यावर गूळखेडा गावात पंधरा दिवसांपूर्वी डांबरीकरण करण्यात आले होते. मात्र पहिल्याच पावसात रस्त्यावरील डांबर निघून गेले असून, रस्ता तयार करताना जी खडी टाकण्यात आली होती, ती उघडी पडली आहे.
अनेक ठिकाणी रस्त्यावर खड्डे पडले असून, त्यामुळे वाहनधारकांची गैरसोय होत आहे.
शेतक-यांची गैरसोय...
प्रत्येक सर्व्हे नंबरमध्ये शेतकरी असून, ते सर्वजण बांधावरून ये-जा करतात. शेतात ट्रॅक्टर व अनेक साधने घेऊन जाण्यासाठी सर्व्हे नंबर बांधावरून जातात. त्यांनाही समस्येला सामोरे जावे लागत आहे.
औसा किंवा लातूरला जाण्यासाठी बिरवली, येल्लोरी, गूळखेडा येथील नागरिकांसाठी हा रस्ता जवळचा असल्याने या रस्त्यावरून रहदारी जास्त आहे. त्यामुळे या कामाकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.