चाकूर-वाढवणा-बाऱ्हाळी हा मार्ग दळणवळणासाठी महत्त्वाचा आहे. नांदेड आणि लातूर जिल्ह्याला जाेणारा मार्ग म्हणून या मार्गाकडे बघितले जाते. परिणामी, या मार्गवरून बाऱ्हाळी, अतनूर, गव्हाण, देऊळवाडी, गुत्ती, रावणकाेळ, घाेणसी, गुडसूर, बाेरगाव, डाऊळ-हिप्परगा, खेर्डा, डाेंगरशेळकी, डांगेवाडी, वाढवणा बु., केसगीरवाडी, वाढवणा खु. उमरगा मन्ना, एकुर्गाराेड, आडाेळवाडी, बेळसांगवी, येवरी, लाळी, साेनवळा, अनुपवाडी, किनी यल्लादेवी, डाेंग्रज, संगाचीवाडी, शेळगाव, राचन्नावाडी, बाेथी, बाेथी तांडा, कलकाेटी, हणमंतवाडी आदी गावांतील वाहनांची माेठ्या प्रमाणावर वर्दळ असते. मुखेड, जळकाेट, उदगीर, चाकूर या तालुक्यांना जाेडणारा महत्त्वपूर्ण मार्ग आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या मार्गाची दुरवस्था झाली आहे. त्याचबराेबर या मार्गावरील पुलांचीही पडझड झाली आहे. वाढवणा बु., डाऊळ-हिप्परगा येथील पुलाची उंची वाढविण्याची गरज आहे. पावसाळ्यात थाेडासाही पाऊस झाला तरी पुलवरून पाणी वाहत आहे. यातून काहीकाळासाठी या मार्गावरील वाहतूक ठप्प हाेते.
वाहनधारकांची हेळसांड...
वाढवणा ते डाऊळ-हिप्परगा या मार्गावरील पुलाची माेठ्या प्रमाणावर दुरवस्था झाली असून, एक बाजू खचली आहे. यातून वाहनधारकांची हेळसांड हाेत आहे. पुलाची उंची वाढवण्यात यावी, अशी मागणी गत अनेक दिवसांपासून हाेत आहे. मात्र, त्याकडे संबंधित प्रशासनाचे दुर्लक्ष हाेत आहे. सध्या डाऊळ-हिप्परगा येथील पूल प्रवासासाठी धाेकादायक असल्याचे समाेर आले आहे. एकेरी बाजूनेच वाहतूक सुरू आहे. एक बाजू पूर्णत: खचल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण झाला आहे.