औसा : २५ टक्के अग्रीमसाठी तालुक्यातील आठही महसूल मंडळे पात्र असतानाही ज्या महसूल मंडळात जास्त नुकसान त्या किल्लारी व मातोळा मंडळांना वगळण्यात आले. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे ४७ हजार शेतकऱ्यांवर अन्याय झाला. यासह आचारसंहितेच्या काळात जवळच्या गावांना लाभ देऊन ३९ गावांना घरकुल योजनेपासून वंचित ठेवल्याचा आरोप करीत महाविकास आघाडीच्या वतीने शनिवारी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
दीड तास चाललेल्या रास्ता रोको आंदोलनामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. आंदोलनकर्त्यांनी शहरातील १९ कोटींची घरकुल योजना योग्य वेळी पाठपुरावा न केल्याने रद्द झाली आहे. तालुक्यातील शेतकरी नैसर्गिक व कृत्रिम आपत्तीमुळे हैराण आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी, संजय गांधी निराधार योजनेतील वंचित लाभार्थींना लाभ द्यावा, औसा टी पाॅईंटवर उड्डाणपूल करावा, प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेतील पात्र लाभार्थींना लाभ देण्याची मागणी यावेळी निवेदनाद्वारे करण्यात आली.
या आंदोलनात श्रीशैल्य उटगे, माजी आ. दिनकर माने, संजय शेटे, रशीद शेख, अमर खानापुरे, मौलाना कलिमुल्लाह कादरी, शाम भोसले, श्रीपतराव काकडे, भरत सूर्यवंशी, नारायण लोखंडे, जयश्री उटगे, सई गोरे, उदयसिंह देशमुख, अझहर हाश्मी, पप्पू कुलकर्णी, बजरंग जाधव, संजय उजळंबे, सुभाष पवार, ॲड. मंजूषा हजारे, खुंदमीर मुल्ला, अनिस जहागीरदार, बालाजी सांळुके आदींसह महाविकास आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते.