लातूर: आषाढी वारीसाठी पंढरपूरला येणाऱ्या व जाणाऱ्या दहा मानाच्या पालख्या, तसेच १३ जून ते ३ जुलै २०२३ या कालावधीत ज्या मार्गावरून जाणाऱ्या व येणाऱ्या वारकऱ्यांच्या व भाविकांच्या हलक्या व जड वाहनांसाठी पथकरातून सूट देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. यासाठी प्रवेशपत्र देण्यासाठी लातूर उप प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयात १३ जून ते ३ जुलै या कालावधीत सकाळी ९ ते रात्री १० पर्यंत स्वतंत्र कक्ष सुरु राहणार असल्याची माहिती उप प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय भोये यांनी दिली.
पंढरपूर आषाढी यात्रेसाठी टोल नाक्यावरून जाणाऱ्या व येणाऱ्या जड व हलक्या वाहनधारकांनी पथकर सूट मिळविण्यासाठी उप प्रादेशिक परिवहन कार्यालयातून पथकर सवलत प्रवेशपत्र (टोल फ्री पास) प्राप्त करून घ्यावे, असे आवाहन भोये यांनी केले आहे.
उपप्रादेशिक कार्यालयामध्ये स्वतंत्र कक्ष स्थापन करण्यात आला असून या कक्षातून पंढरपूरला जाणाऱ्या व येणाऱ्या वाहनांसाठी पथकर सवलतीसाठी प्रवेश पत्र दिले जात आहे. रात्री दहा वाजेपर्यंत हा कक्ष वारकऱ्यांच्या सेवेसाठी असेल असेही भोये सांगितले.