लातूर : कत्तीचा धाक दाखवत, मारहाण करून जबरी चोरी करणाऱ्या दाेघा आरोपींच्या मुसक्या एमआयडीसी पाेलिसांनी अवघ्या दाेन तासांत हत्यार अन् मुद्देमालासह आवळल्या आहेत. याबाबत एमआयडीसी पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पाेलिसांनी सांगितले, ३ जानेवारी राेजी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास फिर्यादी मोटारसायकलवरून पाखरसांगवी शिवारात तळ्यावर मासे पकडण्यासाठी गेला होता. दरम्यान, सायंकाळी ६:३० वाजण्याच्या सुमारास दोघे अज्ञात मोटारसायकलवरून आले. फिर्यादीला लाथा-बुक्क्यांनी मारहाण करून, कत्तीचा धाक दाखवत जिवे मारण्याची धमकी दिली. यावेळी त्याच्या खिशातील ६ हजार २२० रुपये बळजबरीने काढून घेतले. याबाबत एमआयडीसी पाेलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला हाेता. गुन्ह्याचा तपास पोलिस अधीक्षक सोमय मुंडे यांनी सूचना केल्या.
याबाबत अपर पोलिस अधीक्षक डॉ. अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली एमआयडीसी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संजीवन मिरकले यांच्या पथकाने फिर्यादीच्या जबाबावरून, सांगितलेल्या वर्णनावरून अवघ्या दोन तासांत संशयित म्हणून, सिद्धार्थ विजय कांबळे (वय २३, रा. पाखरसांगवी) आणि किशोर विनायक जाधव (वय २३, रा. पाखरसांगवी, लातूर) यांना उचलण्यात आले. त्यांची कसून चाैकशी केली असता, त्यांनी या गुन्ह्याची कबुली दिली. लुबाडलेली रोख रक्कम ६,२२० रुपये आणि गुन्ह्यात वापरलेली कत्ती, मोटारसायकल जप्त करण्यात आली. ही कारवाई पोलिस उपनिरीक्षक डाके, लोखंडे, सहायक फौजदार सर्जेराव जगताप, अंमलदार भीमराव बेल्हाळे, अर्जुनसिंग राजपूत, गोविंद चामे, सिद्धेश्वर मदने, ईश्वर तुरे, महेश गाडे, राम जाधव यांनी केली आहे.