लातूर : शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात असलेल्या उड्डाण पुलावर २२ सप्टेंबर रोजी रात्री ८.३० वाजण्याच्या सुमारास एका व्यापाऱ्याला लुटल्याची घटना घडली होती. दरम्यान, स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने घटनेतील दोघा आरोपींच्या मुसक्या साेमवारी खोरी गल्ली परिसरातून आवळल्या आहेत.
पोलिसांनी सांगितले, जुना औसा रोड परिसरात राहणारे व्यापारी मदन गंगाधर बीदरकर हे गुरुवार, २२ सप्टेंबर रोजी रात्री ८.३० वाजण्याच्या सुमारास आपले दुकान बंद करून दुचाकीवरून घराकडे निघाले होते. दरम्यान, त्यांच्यावर दोघेजण मोटारसायकलवरून पाळत ठेवून पाठलाग केला. उड्डाण पुलावर आल्यानंतर अंधाराचा फायदा घेत त्या दोघांनी हातावर चाकूने वार केले. यावेळी झालेल्या झटापटीत त्यांच्या हाताला गंभीर दुखापत झाली. माेटारसायकलला अडकवलेली बॅग हिसकावत राेकड लंपास केली.
याबाबत शिवाजीनगर पाेलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला हाेत. या गुन्ह्याच्या तपासासाठी पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक अनुराग जैन, डीवायएसपी जितेंद्र जगदाळे यांच्या सुचनेनुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक गजानन भातलवंडे, सहायक पोलीस निरीक्षक सचिन द्रोणाचार्य, पोलीस कर्मचारी अंगद कोतवाड, माधव बिलापट्टे, राजेश कंचे, नवनाथ हासबे, यशपाल कांबळे, राजू मस्के, बंटी गायकवाड, तुराब पठाण, चालक नकूल पाटील यांचे पथक नियुक्त केले.
लातुरातील महादेव नगर भागात राहणारे, खोरी गल्लीत भाड्याच्या खोलीत थांबलेल्या दाेघा संशयिताला पथकाने ताब्यात घेतले. त्यांच्याकडून रोख रक्कम, मोटारसायकल, दुकानाच्या चाव्या, चाकू असा एकूण १ लाख ६० हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. संशयित म्हणून ताब्यात घेतलेल्या मच्छिंद्र लक्ष्मण कोतलापुरे, गोपाळ ज्ञानोबा कोतलापुरे या दोघांनी गुन्ह्याची कबुली दिली. तर तिसरा साथीदार संजय बाबुराव बत्तीसे याच्यासह तिथे भाड्याने रूम करून राहत असल्याचे सांगितले. संजय बत्तीसे याने चोरीतील दुसरी मोटारसायकल आणि वाट्याला आलेले ६० हजार रुपये घेऊन बाहेरगावी गेल्याचेे पथकाला सांगण्यात आले. दोघांनाही ताब्यात घेत शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या स्वाधीन केले, अशी माहिती पोनि. गजानन भातलवंडे यांनी दिली.