औसा तालुक्यातील उजनी- एकंबी तांडा येथील संतराम राठोड हे पदवीधर आहेत. त्यांची पत्नी निरक्षर आहे. मात्र, आपला मुलगा रोहन हा शिकून मोठा झाला पाहिजे, अशी मनोमन इच्छा होती. त्यासाठी आई व वडिलांनी एका शाळेत मासिक २ हजार ५०० रुपयांवर काम केले. मात्र, तिथे परवडत नसल्याने काही दिवस त्यांनी सफाईकामगार म्हणूनही काम केले. त्याचबरोबर त्याच्या आईने मुलाच्या शिक्षणासाठी पैसे कमी पडू नयेत म्हणून शिलाई काम करण्यास सुरुवात केली. त्यातून जमलेल्या पैशातून रोहनचे १२ वीपर्यंतचे शिक्षण केले. रोहननेही आपल्या आई- वडिलांच्या कष्टाची जाणीव ठेवत जिद्दीने अभ्यास करुन यश संपादन केले. तसेच त्याला नीट परीक्षेतही चांगले गुण मिळाले. त्यामुळे त्याचा एमबीबीएसच्या वैद्यकीय शिक्षणासाठी मुंबईतील नामांकित केईएम वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश निश्चित झाला आहे.
या यशाबद्दल रोहन राठोड याचा सत्कार करण्यात आला. यावेळी अशोक चव्हाण, पी.पी. राठोड, लेखा अधिकारी अर्जुन राठोड, प्रसाद पवार, रवि चव्हाण, रमेश राठोड, शंकर राठोड, सुभाष पवार आदी उपस्थित होते.
जिद्दीने अभ्यास केला...
बालपणापासूनच डॉक्टर होण्याची इच्छा होती. आर्थिक परिस्थिती कमकुवत असतानाही आई- वडिलांनी शिक्षणासाठी कधीही पैश्याची कमतरता पडू दिली नाही. आई- वडिलांच्या कष्टाची जाणीव ठेवत कठोर परिश्रम घेत अभ्यास केला. त्यामुळे हे यश मिळाले आहे, असे रोहन राठोड याने सांगितले.