लातूर : जवळपास तीन आठवड्यांनी विलंबाने सुरु झालेल्या पावसाने दोन- तीन दिवसांपासून सतत रिपरिप सुरु केली आहे. त्यामुळे शहरातील शासकीय वसाहतीतील जिल्हा परिषद कन्या प्रशालेस गळती लागली आहे. परिणामी, बसायचे कुठे अन् अध्ययन करायचे कसे? असा प्रश्न विद्यार्थ्यांसमोर आहे, तर पटसंख्या टिकवून ती वाढवायची कशी? असा यक्ष प्रश्न शिक्षकांसमोर निर्माण झाला आहे.
शासकीय कर्मचाऱ्यांच्या निवासासाठी शहरातील बार्शी रोडवरील नवीन जिल्हाधिकारी कार्यालया पाठीमागे काही वर्षांपूर्वी शासकीय वसाहत निर्माण करण्यात आली. या वसाहतील कर्मचाऱ्यांच्या मुलांना येथेच शिक्षण मिळावे म्हणून जवळपास २० वर्षांपूर्वी जिल्हा परिषद कन्या प्रशाला उभारण्यात आली. या प्रशालेत इयत्ता पहिली ते दहावीपर्यंतचे वर्ग असून पटसंख्या १५० आहे. अध्यापनासाठी शिक्षकांची नऊ पदे मंजूर करण्यात आली. सध्या ८ शिक्षक कार्यरत आहेत. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये इमारतीच्या छतास गळती लागत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांची हेळसांड होत आहे.
दारे- खिडक्या तुटल्या, फरशाही फुटल्या...शाळेच्या इमारतीत फरश्या बसविण्यात आल्या होत्या. मात्र, या फरश्या फुटल्या आहेत. तसेच दरवाजे- खिडक्याही तुटले आहेत. गळतीमुळे जवळपास १५- १६ वर्षांपूर्वी केलेला भींतीवरचा रंगही उडाला आहे. पावसाच्या पाण्याचे भिंतीवर आता ओघळच दिसत आहेत. तसेच स्वच्छतागृहही मोडकळीस आले आहे. त्यामुळे विद्यार्थिनींची कुचंबना होत आहे.
प्रशाला जि.प.ची की मनपाची...ही प्रशाला महापालिकेच्या हद्दीत असली तरी ती जिल्हा परिषदेअंतर्गत आहे. मात्र, जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाचे दुर्लक्ष होत आहे. १५ व्या वित्त आयोगाअंतर्गत ग्रामपंचायतीस निधी उपलब्ध होतो. त्यातील काही निधी शाळांवर खर्च करण्याचे शासनाचे निर्देश आहेत. मात्र, ही प्रशाला ग्रामपंचायत हद्दीत नसल्याने मुलभूत सुविधांचीही वाणवा निर्माण झाली आहे. प्रशालेला वाली कोण असा प्रश्न उपस्थित होत आहे.
प्रशालेत गोरगरिब कुटुंबांतील मुले...प्रशाला शासकीय वसाहतीत असली तरी शासकीय कर्मचाऱ्यांचे एकही मुल प्रशालेत नाही. हुडको कॉलनीसह परिसरातील वस्तीतील गोरगरिब, मजूर कुटुंबांतील मुले येथे शिक्षणासाठी येतात. प्रशालेची पटसंख्या कायम रहावी म्हणून शिक्षकांची तर परीक्षाच होत आहे.
गणित, विज्ञानला शिक्षकच नाही...माध्यमिक वर्गातील विद्यार्थ्यांना गणित, विज्ञान विषयाचे अध्यापन करण्यासाठी शिक्षकच नाही. गेल्या चार वर्षांपासून ही समस्या आहे. त्यामुळे पालक आपल्या पाल्यांच्या टीसी काढत आहेत.
दुरुस्तीसाठी पाठपुरावा...कन्या प्रशाला असली तरी मुला- मुलींना येथे प्रवेश देण्यात येतो. सध्या इमारतीस गळती लागली आहे. शिवाय, मुलभूत सुविधाही नाहीत. स्वच्छतागृहासह अन्य आवश्यक सुविधा मंजूर झाल्या असल्याचे सांगण्यात येते. मात्र, प्रत्यक्षात कुठल्याही कामास सुरुवात झाली नाही. मुलभूत सुविधांसाठी जिल्हा परिषदेकडे पाठपुरावा सुरु आहे.- भगवान माळी, मुख्याध्यापक, प्रशाला.