- राजकुमार जाेंधळे लातूर : शहरासह जिल्ह्यातील २३ पाेलीस ठाण्यांच्या हद्दीत बेशिस्त, नियम माेडणाऱ्या वाहनधारकांवर धडक कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान, जानेवारी महिन्यात तब्बल १२ हजार वाहनांवर खटले दाखल करण्यात आले असून, त्यांना एक काेटीचा दंडही केला आहे. यातील जवळपास ५० लाखांचा दंड अद्यापही वाहनधारकांकडे थकला आहे. दंडाच्या वसुलीसाठी पाेलिसांकडून विशेष माेहीम हाेती घेण्यात आली आहे. परिणामी, वाहनधारकांना आता नाेटिसा बजावण्यात आल्या आहेत.
केंद्राच्या वतीने करण्यात आलेल्या नवीन माेटार वाहन कायद्यानुसार आता दंड आकारला जात आहे. त्यानुसारच संबंधित वाहनधारकांवर कारवाईचा बडगा उगारला जात आहे. लातूर शहरासह जिल्ह्यातील विविध मार्गावर पाेलिसांनी नाकाबंदी करत वाहनतपासणी माेहीम हाती घेतली असून, प्रत्येक वाहनांची कसून तपासणी केली जात आहे. वाहनधारकांकडे आढळलेल्या त्रुटी आणि नियमांचे झालेले उल्लंघन यावर दंडात्मक कारवाई केली जात आहे.
नियमांचे उल्लंघन पडले महागात...ई-चलनाच्या माध्यमातून दंड केला आहे. या दंडाचा मेसेज त्यांच्या माेबाईलवर क्षणात पाठविला जाताे. त्यानंतर ताे दंड भरण्याबाबत सतत मेसेज पाठविले जातात. वारंवार सांगूनही जे वाहनधारक दंडाची रक्कम भरत नाहीत, त्यांना न्यायालयाकडून नाेटिसा बजावल्या जात आहेत. हा दंड ऑनलाईन पद्धतीने भरण्याचीही सुविधा आता उपलब्ध झाली आहे. शिवाय, त्या-त्या पाेलीस ठाण्यातही ही रक्कम भरता येईल. तर तालुक्याच्या स्तरावर भरणाऱ्या लाेकअदालतीमध्ये तडजाेड करता येते.
ट्रिपलसीटवाल्यांना दणका...लातूर शहरात पाेलिसांची नजर चुकवत काही जण ट्रिपलसीट सुुसाट आहेत. त्यांच्या वरही जानेवारी महिन्यात कारवाई करण्यात आली आहे. नव्या कायद्यानुसार त्यांना दंड आकरण्यात आला आहे. १०२ वाहनधारकांना एकूण १ लाख २ हजारांचा दंड करण्यात आला आहे. त्यापाठाेपाठ रस्त्यावर बेशिस्तपणे वाहन थांबविणाऱ्यांवर १७ हजारांचा दंड केला आहे. तर लायसन्स न दाखिवणेही अंगलट आले आहे. त्यांना तब्बल २ लाख १४ हजारांचा दंड केला आहे.