लातूर : शहरातील कव्हा रोड येथील एका खत, बि-बियाणे व औषधी दुकानातून ४ लाख ५७ हजार ९४७ रुपयांचे साहित्य खरेदी केले. पैसे ऑनलाईन जमा केले असून, एक ते दोन तासात दुकानाच्या खात्यावर जमा होतील असे सांगितले. मात्र, पैसेच जमा न झाल्याने नाशिक जिल्ह्यातील लासनगाव येथील एकाविरुद्ध विवेकानंद चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी सांगितले, फिर्यादी कृष्णा दिपक खानापूरे (रा. आझाद चाैक, पाठक गल्ली लातूर) यांचे कव्हा रोड परिसरात खत व बि-बियाणे, औषधी दुकान आहे. या दुकानातून २२ फेब्रुवारी रोजी नाशिक जिल्ह्यातील लासनगाव येथील सागर कैलास शिंदे याने एका कंपनीचे तणनाशकाचे ३२० पॅकेट किंमत ४ लाख ९ हजार ८०० रुपये व अन्य एका कंपनीचे तणनाशक २९३ पॅकेट एकूण किंमत ४८ हजार ३४५ असा एकूण ४ लाख ५७ हजार ९४७ रुपयांचा माल खरेदी केला. व्यवहाराची रक्कम आरटीजीएस केले.
यासोबतच एका बँकेचा कोरा चेक फिर्यादीस दिला. परंतू, सदरची रक्कम फिर्यादीस मिळाली नाही. आरोपीने एक ते दोन तासात पैसे जमा होतील असे सांगितले. मात्र, ही रक्कम जमाच झाली नाही. त्यानुसार फिर्यादी कृष्णा खानापूरे यांनी विवेकानंद चौक पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरुन सागर शिंदे याच्याविरुद्ध ४१९, ४२० भांदिवप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक केदार करीत आहेत.