उदगीर : शहरात मंगळवारी आर.टी.ओ. व शहर पोलिसांनी अवैध व विनापरवाना चालणाऱ्या ७५ वाहन धारकाविरुद्ध कारवाई केली. या वाहनधारकांकडून ४ लाख ४३ हजार रुपयांचा दंडही एकाच दिवसात वसूल केला आहे. शिवाय १६ ऑटोही जप्त केले आहेत.
उदगीर शहरातील वाहतुकीला शिस्त लागण्यासाठी प्रशासनाच्या वेळोवेळी बैठका झालेल्या होत्या. या बैठकीत झालेल्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी पालिका, सार्वजनिक बांधकाम, पोलीस, आर.टी.ओ. व महसूल विभाग एकत्र येवून कार्यवाही करीत नव्हते. जिल्हा पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांनी या संदर्भात बैठक घेवून प्रत्येक विभागाने आपापली जबाबदारी पार पाडण्याचे आवाहन केले होते. एकट्या उदगीर शहरात ४ हजार विनापरवाना ऑटोची संख्या असल्याचे आरटीओ व पोलिसांनी या बैठकीत सांगितले होते. मंगळवारी प्रादेशिक परिवहन विभागाचे मोटार वाहन निरीक्षक धनंजय थोरे, मंगेश गवारे, रोहित मामडे, पोलीस निरीक्षक परमेश्वर कदम, सहाय्यक पोलीस निरीक्षक कुदळे व सहकाऱ्यांनी संयुक्त मोहीम राबवून ४ लाख ४३ हजारांचा दंड वसूल केला. ७५ वाहन धारकाविरुद्ध कारवाई करून १६ ऑटो जप्त केले आहेत. ही मोहीम अशीच सुरू राहणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक परमेश्वर कदम यांनी दिली.