- बालाजी थेटे
औराद शहाजानी (जि.लातूर): कोरोनाच्या पार्श्वभुमीवर कर्नाटक सरकारने महाराष्ट्रातून येणा-या प्रवाशांचा आरटीपीसीआर निगेटीव्ह रिपोर्ट बंधनकारक केला आहे. त्यामुळे बुधवारी अनेक प्रवाशांना तपासणी नाक्यावरुन परत पाठविण्यात आले. दरम्यान, या नवीन नियमामुळे लातूर-हैदराबाद महामार्गावरील चेकपाेस्टवर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता कर्नाटक सरकारने खबरदारी म्हणून महाराष्ट्रातून येणाऱ्या प्रवाशांना ७२ तासातील कोराेना तपासणीचा आरटीपीसीआर रिपोर्ट प्रवासात जवळ असेल तरच कर्नाटकामध्ये प्रवेश दिला जात आहे. राष्ट्रीय महामार्ग ७५२ लातूर -हैदराबाद या महामार्गावरील औराद शहाजनी येथील महाराष्ट्र -कर्नाटक सीमेजवळ कर्नाटक प्रशासनाने तपासणी नाका सुरु केला आहे. या नाक्यावर पोलिस प्रशासन व आरोग्य प्रशासन यांची संयुक्त टीम २४ तास तपासणी करीत आहे. महाराष्ट्रातून कर्नाटक व तेलंगणा व आंध्र प्रदेश या राज्यातील शेकडो प्रवासी वाहने दररोज प्रवास करतात. मात्र, कर्नाटक प्रशासनाने अचानक तपासणी नाका सुरु करुन प्रवाशांना आरटीपीसीआर चाचणीचा अहवाल बंधनकारक केला आहे. ज्या प्रवाशांकडे अहवाल नाही त्यांना महाराष्ट्रात परत पाठविले जात आहे. दरम्यान, अत्यावश्यक सेवेतील नागरिकांच्या सीमेवरच रॅपिड ॲन्टीजन चाचणी केली जात आहे. कर्नाटक सीमाभागात मराठी भाषिकांची संख्या मोठी आहे, त्यांचीही औराद परिसरात ये-जा असते. मात्र, त्यांनाही चाचणीचा नियम लागू केल्याने सीमा भागातील नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
दोन डोस घेतलेल्यांनाही प्रवेश नाकारले...बुधवारी महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर लसीकरणाचे दोन डोस घेतलेल्या नागरिकांनाही प्रवेश नाकारण्यात आले. दरम्यान औराद शहाजानी जवळील नाक्याला बिदर जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. डी.एल. नागेश यांनी बुधवारी भेट देऊन पाहणी केली. अहवाल निगेटिव्ह असल्याशिवाय कर्नाटकात प्रवेश देऊ नये असा आदेश त्यांनी कर्मचाऱ्यांना दिला. यावेळी विशेष पथकातील पोलिस उपनिरीक्षक एम.पंडित, पाेहेकॉ. बसवन गाैडा पाटील, सुधाराणी रेड्डी, वैद्यकीय अधिकारी संदीप कुमार, अनिल जमदीकर यांची उपस्थिती होती.