लातूर : प्रत्येक गरोदर महिलेचे सुरक्षित बाळंतपण व्हावे म्हणून शासनाच्या वतीने मोफत आरोग्य सेवा पुरविण्यात येत आहे. त्यामुळे सरकारी रुग्णालयाकडे ओढा वाढला आहे. गेल्या सहा महिन्यांच्या कालावधीत विविध शासकीय रुग्णालयांत ११ हजार ४१२ महिलांची प्रसूती झाली असून, त्याची टक्केवारी ५०.८१ एवढी आहे.
शहरासह ग्रामीण भागातील प्रत्येक गर्भवती महिलेचे आरोग्य चांगले राहावे तसेच तिच्या पोटातील बाळाची व्यवस्थित वाढ व्हावी, नवजात शिशू कुपोषित असू नये, तसेच कुठले व्यंग असल्यास तत्काळ उपचार करता यावेत आणि सुरक्षित प्रसूती व्हावी म्हणून केंद्र शासनाच्या वतीने राष्ट्रीय आरोग्य अभियान राबविण्यात येत आहे. याअंतर्गत जननी शिशू सुरक्षा कार्यक्रम सुरु आहे. या अभियानाची सातत्याने जनजागृती करण्याबरोबरच मोफत आरोग्य सेवा मिळत असल्यामुळे शासकीय रुग्णालयाकडे ओढा वाढला आहे.
जननी शिशू सुरक्षा कार्यक्रमांतर्गत गरोदर मातेची आरोग्य तपासणी, औषधोपचार मोफत करण्यात येतात. त्याचबरोबर प्रसूतीसाठी गर्भवतींना शासकीय रुग्णालयात नेण्यापासून ते प्रसूतीपश्चात घरी आणून सोडण्यापर्यंत सेवा दिली जाते. त्याचबरोबर आवश्यकतेनुसार संदर्भ सेवाही पुरविल्या जातात.
५३४७ : जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालय अंतर्गत२१७४ : प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र.
३८९१ : शासकीय वैद्यकीय महाविद्यालयजिल्ह्यात सहा महिन्यांत २२ हजार ४६१ प्रसूती...रुग्णालय - प्रसूती
सामान्य रुग्णालय - १७६६स्त्री रुग्णालय - १६४७
उपजिल्हा रुग्णालय - ५९७ग्रामीण रुग्णालय - १३३७
प्राथमिक आरोग्य केंद्र - १३१७उपकेंद्र - ८५७
वैद्यकीय महाविद्यालय - ३८९१खासगी रुग्णालय - ११०४९एकूण - २२४६१
जिल्ह्यात सहा ठिकाणी सिझरची सुविधा...जिल्ह्यात स्त्री रुग्णालय, सामान्य रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालयासह ११ ग्रामीण रुग्णालये आहेत. त्यापैकी लातुरातील स्त्री रुग्णालय, उदगिरातील सामान्य रुग्णालय, निलंग्यातील उपजिल्हा रुग्णालय आणि अहमदपूर, औसा, मुरुड येथील ग्रामीण रुग्णालयात सिझरची सुविधा आहे. त्यामुळे नजीकच्या गावातील गर्भवती महिलांची सोय होत आहे.
नैसर्गिक प्रसूतीचे प्रमाण अधिक...जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयांतर्गत एप्रिल ते सप्टेंबर या सहा महिन्यांच्या कालावधीत एकूण ५ हजार ३४७ महिलांची प्रसूती झाली आहे. त्यातील १ हजार १७९ महिलांवर प्रसूतीसाठी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. उर्वरित ४ हजार १६८ मातांची नैसर्गिक प्रसूती करण्यात आली आहे.
जननी शिशू सुरक्षा अंतर्गत मोफत सेवा...केंद्र शासनाच्या जननी शिशू सुरक्षा कार्यक्रमांतर्गत गरोदर मातांना प्रसूतीसाठी शासकीय रुग्णालयात नेणे, प्रसूतीपश्चात आई व बाळास घरी सोडणे, त्याचबरोबर नैसर्गिक प्रसूती झाल्यास तीन दिवस मोफत नाश्ता, भोजन दिले जाते. विशेषत: प्रसूतीवेळी रक्ताची आवश्यकता भासल्यास मोफत रक्तपुरवठाही करण्यात येतो.
शासकीय आरोग्य सुविधांचा लाभ घ्यावा...शासनाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या आरोग्यविषयक योजनांची सातत्याने जनजागृती करण्यात येत असल्याने सरकारी रुग्णालयाकडे ओढा वाढला आहे. शहरासह ग्रामीण भागातील गरोदर महिलांनी शासकीय रुग्णालयात प्रसूती करुन घ्यावी. आवश्यक त्या आरोग्य सुविधा उपलब्ध असल्याने कुटुंबीयांवर कुठलाही आर्थिक भार पडणार नाही.- डॉ. प्रदीप ढेले, जिल्हा शल्यचिकित्सक.