जिल्हा परिषदेच्या वित्त विभागामार्फत विविध विभागांच्या योजनांचे अनुदान लाभार्थी, कर्मचाऱ्यांना प्रचलित पद्धतीनुसार धनादेशाद्वारे अदा केले जात होते, परंतु देयकातील पारदर्शकता, तसेच वेळेचा अपव्यय टाळण्यासाठी आता एसबीआयमार्फत सीएमपी (कॅश मॅनेजमेंट प्रॉडक्ट) प्रणालीद्वारे केली जाणार आहे.
शिक्षण विभागाच्या शालार्थ टीमने सहा महिन्यांपासून शिक्षकांच्या वेतनाची सीएमपी प्रक्रिया यशस्वी करून दाखविण्याची तयारी केली आहे. त्याद्वारे दर महिन्यास ५ हजारांपेक्षा अधिक शिक्षक, मुख्याध्यापकांच्या खात्यामध्ये वेतन रक्कम व कपाती अचूक वर्ग करण्यात येतील. त्यामुळे शिक्षकांचे वेतन महिन्याच्या एक तारखेस अदा होईल.
आर्थिक व्यवहारात पारदर्शकता आणण्यासाठी जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल केंद्रे यांच्या सूचनेवरून मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल, मुख्य लेखा व वित्त अधिकाऱ्यांनी एसबीआय सीएमपी प्रणालीचा स्वीकार केला आहे. ही प्रणाली वित्त विभागासह सर्व विभाग, पंचायत समितीमध्येही लागू करावयाची आहे.
राज्यात तिसरी जिल्हा परिषद ठरणार...
लातूर जिल्हा परिषदेच्या एका पथकाने पुणे, जालना येथे जाऊन तेथील सीएमपी प्रणालीचा अभ्यास केला आहे. लवकरच जिल्हा परिषदेत ही नवी प्रणाली लागू केली जाणार आहे. त्यामुळे लातूर जि.प. राज्यात तिसरी ठरणार आहे. या प्रणालीचा ५ हजारांपेक्षा जास्त शिक्षक, मुख्याध्यापकांना लाभ होणार आहे.
- राहुल केंद्रे, अध्यक्ष, जिल्हा परिषद
आर्थिक नोंदीचा आढावा घेणे होणार सोपे...
जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल केंद्रे व उपाध्यक्षा भारतबाई सोळुंके यांनी वारंवार बैठका घेऊन या विषयाला चालना दिली आहे. जिल्हा परिषदेच्या विविध विभागांतून केल्या जाणाऱ्या आर्थिक व्यवहारांच्या नोंदीचा आढावा घेणे सीएमपी प्रणालीतून सोपे होणार आहे.