लातूर : जिद्द, चिकाटी, कठोर परिश्रम आणि अभ्यासात सातत्य असल्यास यशाचे शिखर गाठता येते. हे टाका येथील ज्ञानेश्वरी तोळमारे हिने आपल्या कृतीतून दाखवून दिले आहे. सलग दुसऱ्यांदा एमपीएससीची परीक्षा उत्तीर्ण होण्याचा मान तिने मिळविला असून, यंदा क्लास वन ची पोस्ट तिला मिळणार आहे. विशेष म्हणजे राज्यात मुलींमधून १५ वी येण्याचा बहुमान तिने मिळविला आहे.
औसा तालुक्यातील टाका येथील ज्ञानेश्वरी सूर्यकांत तोळमारे हिचे प्राथमिक शिक्षण गावातीलच जिल्हा परिषद शाळेत तर माध्यमिक शिक्षण सावित्रीबाई फुले कन्या प्रशालेत झाले. तर पदवीचे शिक्षण लातूरातील दयानंद विज्ञान महाविद्यालयात पूर्ण केले. वडील अल्पभूधारक शेतकरी असल्याने आपण शासकीय अधिकारी होऊन आई-वडिलांचे स्वप्न पूर्ण करावे, असे ध्येय ज्ञानेश्वरी हिने बालपणापासूनच मनाशी बाळगले होते. त्यामुळे ज्ञानेश्वरी हिने पदवी पूर्ण होताच स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू केली. त्यात आतापर्यंत तीनवेळा परीक्षा दिली असून, पहिल्या प्रयत्नात एसटीआयची पोस्ट मिळाली. या पदावर काही दिवसातच पोस्टिंग होणार होती. मात्र, त्याआधीच राज्यसेवा परीक्षेचा निकाल जाहीर झाला आणि ज्ञानेश्वरीचे क्लास वन अधिकारी होण्याचे स्वप्न सत्यात उतरले आहे. ज्ञानेश्वरी हिने मुलींमधून राज्यात १५ वा आणि मुला-मुलींमधून २१० वा क्रमांक मिळविला असून, राज्यसेवा पूर्व परीक्षा जानेवारी २०२२ मध्ये झाली. तसेच मुख्य परीक्षा मे २०२२ आणि मुलाखत फेब्रुवारी २०२३ मध्ये झाली. त्यात ज्ञानेश्वरी हिने राज्यात मुलींमधून १५ वा क्रमांक मिळवीत आई-वडिलांचे स्वप्न पूर्ण केले आहे. या यशाबद्दल सर्व क्षेत्रातून ज्ञानेश्वरी हिचे कौतुक होत आहे.
अभ्यासात सातत्य ठेवावे...स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी अभ्यासात सातत्य ठेवावे. कठोर परिश्रम, जिद्द, चिकाटीच्या जोरावर यश नक्कीच मिळते. अपयश आले तरी खचून जाऊ नये. स्पर्धा परीक्षेची तयारी करताना विद्यार्थ्यांनी प्लॅन बी तयार ठेवावा. आई-वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी कठोर परिश्रम घेतल्यास निश्चितच यश मिळते. - ज्ञानेश्वरी तोळमारे
अल्पभूधारक असतानाही मुलीला शिकविले...सूर्यकांत तोळमारे हे अल्पभूधारक शेतकरी असून, आपली मुले शिकली पाहिजेत, मोठे अधिकारी झाले पाहिजेत यासाठी त्यांनी मुलांच्या शिक्षणाकडे विशेष लक्ष ठेवले. स्पर्धा परीक्षेची तयारी करताना मुलीला कुटुंबीयांनी भक्कम साथ दिली. त्यामुळेच अभ्यासात सातत्य ठेवता आले आणि यशाचे शिखर गाठता आले.