जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली असल्याने गावोगावी निवडणुकीची रणधुमाळी आहे. कोरोना संसर्ग शक्यता लक्षात घेऊन ग्रामपंचायत निवडणुका बिनविरोध व्हाव्यात अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. निवडणुका बिनविरोध झाल्यास गावच्या विकासाला अधिक चालना मिळून गावचा एकोपाही कायम टिकून राहण्यास मोठी मदत होणार आहे. निवडणुकीच्या दरम्यान होणारे हेवे-दावेही यामुळे टाळले जाणार आहे. ग्रामपंचायत निवडणुका बिनविरोध झाल्यास जिल्हा परिषदेच्या माध्यमातून या ग्रामपंचायतींना आदर्श ग्राम निर्मितीसाठी विशेष सहकार्य करण्यात यावे, अशी सूचना माजी मंत्री आ. संभाजी पाटील निलंगेकर यांनी दिली आहे. त्यानुसार बिनविरोध ग्रामपंचायतींना आगामी काळात विविध योजनेच्या माध्यमातून विशेष लाभ मिळवून देण्यासाठी प्राधान्य देण्यात येईल, असे जि.प. अध्यक्ष राहुल केंद्रे यांनी सांगितले.
गावपातळीवर समन्वय हवा...
जिल्हा परिषदेसोबतच आ. संभाजी पाटील निलंगेकरही बिनविरोध ग्रामपंचायतींना विशेष सहकार्य करणार असल्याचे सांगून जिल्ह्यातील अधिकाधिक ग्रामपंचायत निवडणुका बिनविरोध व्हाव्यात याकरिता स्थानिक पातळीवरील नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी समन्वय राखून निवडणुका बिनविरोध होण्यासाठी पुढाकार घ्यावा असे आवाहनही जिल्हा परिषदेचे अध्यक्ष केंद्रे, उपाध्यक्ष साेळुंके यांनी केले आहे.