ढगाळ वातावरणाचा रबी पिकांवर परिणाम
लातूर : जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे. त्यामुळे रबी हंगामातील पिकांवर रोगाचा प्रादूर्भाव दिसून येत आहे. यंदा जिल्ह्यात ३ लाख ३० हजार हेक्टरवर रबीचा पेरा झाला आहे. यामध्ये सर्वाधिक २ लाख २७ हजार हेक्टरवर हरभरा आहे. कृषी विभागाच्यावतीने शेतकऱ्यांना फवारणीबाबत मार्गदर्शन केले जात आहे. सध्या थंडी कमी झाली असल्याचे चित्र आहे.
मुख्य रस्त्यावर गतिरोधक बसविण्याची मागणी
लातूर : शहरातील पाच नंबर चौक ते शासकीय महिला तंत्रनिकेतन रस्त्यावर अवजड वाहनांची वर्दळ असते, तसेच या मार्गावर महाविद्यालय असल्याने विद्यार्थ्यांची ये-जा सुरू असते. या रस्त्यावर गतिरोधक नसल्याने अनेक वाहने सुसाट धावतात. त्यामुळे अपघाताचा धोका टाळण्यासाठी गतिरोधक बसविण्याची मागणी होत आहे. यापूर्वी गतिरोधक होते; मात्र रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आल्याने गतिरोधक नाहीत. त्यामुळे संबंधित विभागाने तत्काळ गतिरोधक बसविण्याची मागणी केली जात आहे.
धूम्रपान करण्यास प्रतिबंध आदेश जारी
लातूर : राष्ट्रीय तंबाखु नियंत्रण कार्यक्रमांतर्गत सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करण्यास प्रतिबंध करण्यात आला असून, जिल्ह्यातील सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालय परिसर, शासकीय आणि खासगी आस्थापना आदी ठिकाणे तंबाखुमुक्त करण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. या क्षेत्रात तंबाखुजन्य पदार्थांचे सेवन करण्यास मनाई आदेश जारी करण्यात आला असून, दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. त्यानुसार प्रत्येक कार्यालयाच्या दर्शनी भागात फलक लावले जाणार असल्याचे आदेशात म्हटले आहे.
चाकूर येथे मधुमक्षिका पालन प्रशिक्षण
लातूर : चाकूर येथे पाच दिवसीय मधुमक्षिका पालन प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. लातूर रोड येथे १८ जानेवारीपर्यंत प्रशिक्षण होणार असून, नाव नाेंदणीसाठी दिनकर पाटील यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाच्यावतीने करण्यात आले आहे. शेतकरी व मधुमक्षिका पालन करणाऱ्यांनी या शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.