लातूर : शहरातील नवीन नांदेड नाका परिसरातील इलेक्ट्रिकल्स साहित्याचे दुकान फाेडणारा सराईत गुन्हेगार शनिवारी पाेलिसांच्या जाळ्यात अडकला. त्याच्याकडून १ लाख ९९ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
पाेलिसांनी सांगितले, लातुरातील नवीन नांदेड नाका परिसरातील इलेक्ट्रिक दुकानाचे गोदाम २२ ते २३ जूनच्या मध्यरात्री फोडून चोरट्यांनी इलेक्ट्रिकल साहित्य चाेरून नेले हाेते. याबाबत विवेकानंद चौक ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. दरम्यान, पोलिस अधीक्षक सोमय मुंडे यांनी तपासाचे आदेश दिले हाेते. त्यानुसार अपर पोलिस अधीक्षक डॉ. अजय देवरे, लातूर डीवायएसपी भागवत फुंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या पथकाने आराेपीचा शाेध घेतला. खबऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, प्रशांत अशोक गाडेकर (वय ३३, रा. भादा, ता. औसा, ह. मु. नवीन नांदेड नाका, गरुड चाैक, लातूर) याला शनिवारी अटक करण्यात आली. अधिक चाैकशी केली असता, त्याने साथीदाराच्या मदतीने गुन्हा केल्याची कबुली दिली. त्याच्याकडून चोरलेले इलेक्ट्रिकल साहित्य, केबल असा मुद्देमाल जप्त केला आहे.
विविध पाेलिस ठाण्यात चाेरीचे आठ गुन्हे दाखल...लातूर पाेलिसांच्या ताब्यात असलेला आरोपी प्रशांत गाडेकर हा सराईत गुन्हेगार असून, त्याने यापूर्वी लातूर जिल्ह्यातील विविध पाेलिस ठाण्यांच्या हद्दीत चाेरीचे गुन्हे केले आहेत. याबाबत त्याच्याविराेधात भादा, मुरुड, रेणापूर, औसा, एमआयडीसी, लातूर ग्रामीण, गातेगाव, गांधी चौक ठाणे लातूर येथे चोरीचे आठ गुन्हे दाखल आहेत.
या पथकाने लावला दुकान फाेडीचा छडा...लातुरातील विविध पाेलिस ठाण्यांच्या हद्दीत चाेरी, घरफाेडी आणि दुकान फाेडणाऱ्या टाेळीतील एकाला पाेलिसांनी शनिवारी अटक करत गुन्ह्यांचा छडा लावला आहे. ही कारवाई पोलिस निरीक्षक सुधाकर बावकर, सपोनि. रामचंद्र केदार, पोउपनि. महेश गळगटे, वाजीद चिखले, कोकणे, बेरळीकर, रमेश नामदास यांच्या पथकाने केली आहे.