उदगीर (जि. लातूर) : तालुक्यातील कुमठा (खु.) येथील एका १४ वर्षीय शाळकरी मुलाचा खून झाल्याची घटना शनिवारी दुपारी उघडकीस आली होती. मयत मुलाच्या वडिलांच्या तक्रारीवरून उदगीर ग्रामीण पोलिस ठाण्यात खुनाचा व पुरावा नष्ट करण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, पोलिसांनी एका संशयितास ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने खुनाची कबुली दिली आहे. मोबाईल चोरल्याच्या संशयातून खून झाल्याचे पोलिसांनी सांगितले.
पोलिस निरीक्षक अरविंद पवार यांनी सांगितले, तालुक्यातील कुमठा (खु.) येथील १४ वर्षीय मुलाचा शनिवारी सकाळी ११.३० वा. च्या सुमारास मृतदेह आढळल्याची माहिती मिळाली. त्यावरुन ग्रामीण पोलिसांच्या पथकाने घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. मयत मुलाच्या वडिलांच्या तक्रारीवरून ग्रामीण पोलिसांत खुनाचा व पुरावा नष्ट करण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. खुनाचा उकल करण्यासाठी त्याच गावात एका शेतकऱ्याकडे सालगडी म्हणून काम करणारा किरण ज्ञानोबा देवनाळे (२८, रा. पिंपरी, ता. उदगीर) यास रात्री ताब्यात घेण्यात आले. सखोल चौकशी केली असता त्याने खून केल्याची कबुली रात्री उशिरा दिली. आरोपीचा मोबाईल मयत मुलगा संतोष गोविंद घुगे याने चोरल्याचा संशय आल्यावरून बुधवारी रात्रीच्या सुमारास फावड्याच्या दांड्याने डोक्यात वार केला. तसेच दगडाने चेहरा विद्रुप करण्याचा प्रयत्न केला. तसेच सोबतच्या ब्लेड व कटरने त्याचे केस कापून चेहरा विद्रुप करून मृतदेह शेतानजिकच्या नालीत नेऊन टाकला.
या खुनात वापरलेला फावड्याच्या दांडा, ब्लेड, कटर, मयत मुलाचा मोबाईल, घड्याळ, आरोपीचे रक्ताने माखलेले कपडे आरोपीकडून पोलिसांनी जप्त केले. आरोपीस रविवारी उदगीर येथील न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. खुनाचा उकल करण्यासाठी ग्रामीण पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक सुमित बनसोडे, रवींद्र तारू, तानाजी चेरले, पोहेकॉ. व्यंकट शिरसे, राजीव घोरपडे यांनी प्रयत्न केले. अधिक तपास उपविभागीय पोलिस अधिकारी दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक अरविंद पवार हे करीत आहेत.