- महेश पाळणेलातूर : शालेय क्रीडा स्पर्धेच्या हंगामाला लवकरच सुरुवात होणार असून, स्पर्धेच्या आयोजनसाठी लातूरच्या क्रीडा विभागाने कंबर कसली आहे. दरम्यान, मागील काही वर्षांत शाळांतील विद्यार्थ्यांच्या सहभागाचे प्रमाण २५ टक्क्यांहूनही कमी आहे. त्यामुळे अधिकाधिक शालेय विद्यार्थी मैदानावर यावेत, यासाठी क्रीडा खात्याची धाव सुरू आहे. त्यासाठी शाळा, महाविद्यालयांना सूचना करण्यात आल्या आहेत.
प्रतिवर्षी लातूरच्या क्रीडा विभागामार्फत तालुका, जिल्हा, विभाग व राज्यस्तरीय शालेय स्पर्धांचे आयोजन करण्यात येते. जिल्ह्यात जवळपास २,७०० शाळा असून, यात पावणेतीन लाख विद्यार्थी आहेत. त्या तुलनेत शालेय स्पर्धेत मात्र शाळांचा सहभाग अल्प असतो. गत दोन वर्षांपासून शालेय स्पर्धांच्या प्रवेशिका ऑनलाइन झाल्याने खरी आकडेवारी समोर येत आहे. शाळा व विद्यार्थिसंख्येचा विचार केला, तर विद्यार्थ्यांचा २५ टक्क्यांहून कमी सहभाग दिसून येत आहे. शारीरिक शिक्षणाला महत्त्व देण्यासाठी शासनही प्रयत्न करीत असले तरी प्रत्यक्षात मोबाइलच्या युगात विद्यार्थी मात्र मैदानापासून का दुरावले जात आहेत, याचा विचारही होणे गरजेचे आहे. त्यामुळे यंदाच्या वर्षात क्रीडा विभागाने सहभाग वाढीसाठी धावाधाव सुरू केली आहे.
खेळांची संख्या शंभराजवळशालेय स्पर्धेत खेळांची संख्या ९३ असून, अनुदानित खेळ प्रकार ४९, तर विनाअनुदानित खेळ प्रकार ४४ आहेत. काही मोजके खेळ वगळता बऱ्याच खेळांत खेळाडूंचा सहभाग कमी दिसून येतो. अनेक शाळांना क्रीडा शिक्षक व मैदान नसल्याने अडचण आहे. ग्रामीण व शहरी, अशा दोन प्रकारांत जिल्ह्यात स्पर्धा होते. शंभराजवळ खेळ असले तरी सहभागाचा टक्का मात्र कमीच दिसतो.
कबड्डी, खो- खो, व्हॉलीबॉलला प्रतिसाद...तालुका व जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेत सांघिक खेळांतील कबड्डी, खो- खो, व्हॉलीबॉलसह क्रिकेट खेळाला पसंती आहे. कुस्तीलाही मल्लांचा सहभाग ठीकठाक असतो. मात्र, खेळाचा राजा फुटबॉल, रायफल शूटिंग व अनेक खेळांत संघ अथवा खेळाडूंचा सहभाग मोजकाच असतो. त्यामुळे कमी सहभाग असलेल्या खेळावर लक्ष केंद्रित करून सहभाग वाढविण्याचा प्रयत्न क्रीडा विभाग करीत आहे.
३२ हजार विद्यार्थी गेल्यावर्षी मैदानात...वर्ष - शाळा - विद्यार्थी२०२३- २४ - ५६६ - ३२,६२८२०२२- २३ - ४७० - १७,६८८२०२१- २२ - ४४० - १५,४२९
विद्यार्थ्याने किमान एका खेळात सहभागी व्हावे...प्रत्येक शाळेने शालेय क्रीडा स्पर्धेत सहभागी होण्यासाठी, तसेच प्रत्येक विद्यार्थ्याने किमान एका खेळात भाग घ्यावा म्हणून शालेय शिक्षण विभागाच्या विभागीय उपसंचालकांना पत्र पाठविले आहे. शासकीय व निमशासकीय शाळांकडून प्राथमिक प्रवेशिका मागविण्याची प्रक्रिया ऑनलाइन सुरू आहे.-जगन्नाथ लकडे, प्रभारी, क्रीडा उपसंचालक, लातूर