जिल्ह्यात नववी ते दहावीच्या ६३२ शाळा आहेत. त्यापैकी ६१२ शाळा सुरू झाल्या आहेत. तर उच्च माध्यमिकच्या २७६ पैकी २५८ शाळा सुरू आहेत. सोमवारपासून विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत दररोज वाढ होत आहे. गुरुवारी नववी ते दहावीचे ३० हजार १६५ विद्यार्थी वर्गामध्ये उपस्थित होते. तर अकरावी ते बारावीच्या ७ हजार ४६२ विद्यार्थ्यांनी ऑफलाइन शिक्षणाचा लाभ घेतला. गत आठवड्यामध्ये नववी ते बारावीची एकूण विद्यार्थ्यांची उपस्थिती केवळ १२ टक्के होती. तर या आठवड्यामध्ये २० ते २५ टक्के उपस्थिती आहे. वसतिगृह सुरू नसल्यामुळे उपस्थितीचे प्रमाण कमी आहे. अकरावी, बारावीचे बहुतांश विद्यार्थी बाहेरगावचे आहेत. त्यांच्या राहण्याची सोय नसल्यामुळे त्यांना वसतिगृह सुरू होण्याची प्रतीक्षा त्यांना आहे. वसतिगृह सुरू झाले तर ५० ते ६० टक्के विद्यार्थ्यांची उपस्थिती राहील अशी अपेक्षा आहे.
दरम्यान शिक्षण विभागाने जिल्ह्यातील ९ हजार ४०१ शिक्षकांच्या तपासण्या पूर्ण केल्या आहेत. शंभर टक्के तपासणी पूर्ण झाली असून या तपासणीत ८७ शिक्षकांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. तर २ हजार २६४ शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या तपासण्या करण्यात आल्या आहेत. यात २५ कर्मचाऱ्यांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील वीस ते पंचेवीस शाळा अद्यापही बंद आहेत.