राजकुमार जाेंधळे
लातूर : निलंगा तालुक्यातील कोतलशिवणी (जि. लातूर) येथे प्राचीन इतिहास अभ्यासक सौदागर बेवनाळे यांना गजलक्ष्मीचे शिल्प आढळून आले आहे. मूर्तीशास्त्राच्या अभ्यासासाठी ही एक चांगली पर्वणी असल्याचे अभ्यासकांनी सांगितले आहे.शिल्पाविषयी माहिती देताना सौदागर बेवनाळे म्हणाले, एका विकसित कमलपुष्पावर विराजमान झालेली लक्ष्मी आणि तिच्या दोन्ही बाजूने असलेले दोन गजराज, असे हे शिल्प आहे. शिल्पातील गजराजांनी सोंडेत धरलेल्या कळशांमधून देवी लक्ष्मीवर अखंड जलाभिषेक करत असल्याचे शिल्पात दाखविण्यात आले आहे.
लक्ष्मीशिल्पाला शेंदूर लावलेला नाही. ही मूर्ती जमिनीत अर्ध्या स्वरूपात गाडलेली असून, मूर्तीतील हत्ती व लक्ष्मीच्या दगडी भागाची झीज झाल्यामुळे शिल्प जीर्ण स्वरूपात दिसत आहे. मूर्तीची लांबी सव्वातीन फूट तर उंची अडीच फूट आहे. जाडी साधारणपणे दहा इंच असावी. या गजलक्ष्मी शिल्पामुळे कोतलशिवणी गावचा इतिहास उजेडात येण्यास मदत होईल. मध्ययुगीन कालखंडातील येथील प्रवासी व्यापारी, राजघराण्यावर गजलक्ष्मीचा वरदहस्त होता. सातवहन कालीन नाणी, पदके यावरही अशाच गजलक्ष्मीचे चित्र पाहावयास मिळते. आढळून आलेली मूर्ती स्थापत्यकलेच्या सामर्थ्याचे दर्शन घडविते.
भटकंतीतून इतिहास...
सौदागर बेवनाळे यांनी केेलेल्या भटकंतीतून हा इतिहास समोर आल्याचे मंगळवारी सांगितले. हा समग्र अभ्यास समजून घेताना ज्ञानदेव वाघमारे गुरुजी, तानाजी दत्तात्रय पाटील, हभप राजेंद्र मिरगाळे, विभाकर देशपांडे, गणेशभाऊ शेळके, गोविंदराव पाटील, रमेश शेळके, सरपंच गीताकाकी राजपूत व ग्रामस्थांचे सहकार्य लाभले. मूर्तीशास्त्राच्या अभ्यासकांना ही संधी असून, शिल्पाचे रक्षण व संवर्धन व्हावे, असे सौदागर बेवनाळे यांनी सांगितले.