लातूर: मालमत्ता कर थकीत असणाऱ्या दोन मालमत्तांना मनपाच्या पथकाने मंगळवारी सील ठोकले. वारंवार नोटिसा देऊनही कर भरणा केला जात नसल्याने पालिकेच्या वतीने ही कारवाई करण्यात आली. मालमत्ताधारकांनी आपल्याकडील कर लवकरात लवकर भरणा करावा अन्यथा दंडात्मक कारवाई करण्यात येईल असा इशाराही मनपाच्या वतीने देण्यात आला.
लातूरएमआयडीसी परिसरातील धीरज टाइल्स यांच्याकडे २३ लाख ४४ हजार ६७१ रुपये थकबाकी होती.तसेच पॅनिका एनर्जी यांच्याकडेही मालमत्ता करापोटी ३१ लाख रुपये कर थकलेला होता.या दोन्ही मालमत्तांना मंगळवारी मनपाच्या वतीने सील ठोकण्यात आले. मनपा उपायुक्त शुभम क्यातमवार यांच्या मार्गदर्शनात ही कारवाई करण्यात आली.कर अधिक्षक सतीश टेंकाळे मनपाचे पथक प्रमुख समाधान सूर्यवंशी,जे.एम.ताकपिरे, सहाय्यक पथक प्रमुख चंद्रकांत बावगे,कर निरीक्षक प्रदीप जोगदंड, वसुली लिपिक संतोष फिसके, कुरकुट यांच्या पथकाने ही कारवाई करण्यात आली.
एमआयडीसी परिसर, कृषी उत्पन्न बाजार समिती परिसर तसेच शहराच्या इतर भागात ज्या नागरिकांचा मालमत्ता कर थकलेला आहे अशा मालमत्ता धारकांनी आपल्याकडील कराची थकबाकी दिनांक ३१ मार्च पूर्वी मनपाकडे जमा करून व्याज माफी योजनेचा लाभ घ्यावा. वेळेच्या आत मालमत्ता कराचा भरणा करण्यात आला नाही तर थकीत मालमत्ता धारकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल,असा इशाराही मनपाकडून देण्यात आला आहे.