शिक्षक सहकारी संघटनेचे निवेदन
लातूर : सीएमपी प्रणालीद्वारे वेतन केले जावे, अशी मागणी शिक्षक सहकार संघटनेच्या वतीने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. यावेळी संघटनेचे संतोष पिटलवाड, मनोज बनकर, माधव चिलमे, संतोष कासले, राम शेवाळे, भाग्यश्री चव्हाण, मीना चांडेश्वर आदींसह संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.
जिल्ह्याच्या तापमानात घट; थंडी वाढली
लातूर : गेल्या आठवडाभरापासून जिल्ह्याच्या किमान तापमानात घट झाली असून, तापमान १३ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले आहे. त्यामुळे थंडी वाढली असल्याचे चित्र आहे. लातूर शहरातील महात्मा गांधी चौक, गंजगोलाई, दयानंद गेट परिसर, राजीव गांधी चौक, अंबाजोगाई रोड, रेणापूर नाका, ५ नंबर चौक आदी भागांत ऊबदार कपड्यांची दुकाने थाटली आहेत. थंडी रबी हंगामातील पिकांसाठी पोषक ठरत आहे.
महिला शिक्षण दिन निर्णयाचे स्वागत
लातूर : महाविकास आघाडी सरकारने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस महिला शिक्षण दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचे ॲड. प्रदीपसिंह गंगणे, बालाजी पिंपळे, प्रा. दत्तात्रय खरटमोल, ताहेर सौदागर, प्रा. ओमप्रकाश झुरळे, जमालोद्दीन मणियार, आनंद पारसेवार, ॲड. सुहास बेद्रे, ॲड. अभिजित मगर, किरण कांबळे, ॲड. सुषमा गंगणे, ॲड. छाया मलवाडे, श्रीकांत गंगणे, ॲड. शीतल जाधव, प्रवीण नाबदे आदींनी कौतुक केले आहे.
फलोत्पादन अभियान; अर्ज करण्याचे आवाहन
लातूर : एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान २०२०-२१ अंतर्गत लातूर जिल्ह्यासाठी फळपीक लागवड, मशरुम उत्पादन, शेड-नेट हाऊस, प्लास्टिक मल्चिंग, ट्रॅक्टर २० एचपी, शेतकरी अभ्यास दौरा, सामूहिक शेततळे, वैयक्तिक शेततळे, कांदा चाळ, पॅक हाऊस, प्राथमिक प्रक्रिया केंद्र आदी घटकांसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. ३१ डिसेंबर अर्ज करण्याची अंतिम तारीख असून, यामध्ये जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सहभागी होण्याचे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी गावसाने यांनी केले.