लातूर : दारिद्र्य रेषेखालील महिलांचेलातूर शहरांमध्ये १ हजार २५६ बचतगट स्थापन करण्यात आले आहेत. या बचत गटांना महानगरपालिका राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान अंतर्गत प्रत्येकी दहा हजार रुपयांचा फिरता निधी दिला आहे. तर यातील दहा गटांना एकत्र करून ४८ वस्तीसंघ स्थापन केले आहेत. त्यांनाही प्रत्येकी ५० हजार रुपयांचा फिरता निधी दिला आहे. या निधीतून महिला बचत गटांनी छोटे-मोठे उद्योग व्यवसाय सुरू करून आपले अर्थकारण सावरले आहे.
महिला बचत गटांना स्वतःच्या पायावर उभे राहता यावे यासाठी लातूर महापालिकेने राष्ट्रीय नागरिक अभियान मार्फत वेगवेगळे उपक्रम हाती घेतले आहेत. फिरता निधी देण्याबरोबरच वस्तीसंघ स्थापन केले आहेत. त्यांना कर्ज देण्याचाही उपक्रम हाती घेतला आहे. खेळते भांडवल आणि उद्योग व्यवसायांना अर्थसहाय्य मिळवून महिला बचत गटांचे अर्थकारण सुधारणे हा या उपक्रमाचा मुख्य हेतू आहे.
महापालिकेने केले पंधरा हजार महिलांचे संघटन...१२५६ बचत गट स्थापन करून यातील १०८२ बचत गटांना खेळते भांडवल दिले आहे. विशेष म्हणजे यातील किमान दहा गट एकत्र करून ४८ वस्तीसंघ स्थापन केले आहेत. यापैकी ४४ वस्ती संघाला ही खेळते भांडवल वितरित करण्यात आले आहे. यातून पंधरा हजार महिलांचे संघटन शहरात तयार झाले आहे. मनपाच्या खेळत्या भांडवलावर आणि स्वनिधीवर बचत गटातील या महिलांचे छोटे मोठे व्यवसाय सुरू झाल्याने अर्थकारण रुळावर आले आहे.
आर्थिक परिस्थिती सुधारलेल्या बचत गटांना कर्ज....आर्थिक परिस्थिती सुधारलेल्या १११० बचत गटांना कर्जही वितरित करण्यात आले आहे. बचत गटाच्या मागणीनुसार कर्ज देण्यात आले असून सर्वांना मिळून १७ कोटी रुपयांचे कर्ज वितरित केले आहे. त्यामुळे या बचत गटांचा व्यवसाय तेजीत आहे असे राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानामार्फत सांगण्यात आले.
४४ वस्ती संघाला ५० हजारांचे खेळते भांडवल...महिला बचत गटामध्ये ७५ टक्के महिला दारिद्र्य रेषेखालील आहेत. त्यांच्या आर्थिक परिस्थितीला रुळावर आणण्यासाठी बचत गट स्थापन करण्यात आले. या गटांचे एकत्रीकरण करून वस्तीसंघ तयार करण्यात आला आहे. आता या संघांना प्रत्येकी ५० हजार रुपये खेळते भांडवल देण्यात आले आहे. १०८२ बचत गटांना प्रत्येकी १० हजार प्रमाणे १ कोटी ८२ हजार रुपयांचे तर ४४ वस्तीसंघांना खेळते ५० हजार प्रमाणे २२ लाखांचे खेळते भांडवल केले आहे.