लातूर : काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते, राज्य साक्षरता परिषदेचे माजी अध्यक्ष व ग्रंथालय चळवळीचे आधारवड अॅड. त्र्यंबकदास झंवर यांचे गुरुवारी पहाटे ४.४५ वा. च्या सुमारास लातुरात त्यांच्या राहत्या घरी अल्पश: आजाराने निधन झाले. मृत्यूसमयी ते ७० वर्षांचे होते.
लातूरच्या राजकारण, समाजकारण, व्यापार, उद्योग, कृषी, सिंचन, शिक्षण, ग्रंथालय, पर्यावरण अशा सर्वच क्षेत्रात त्यांचे मोलाचे योगदान राहिले आहे. लोकनेते विलासराव देशमुख यांचे ते खंदे समर्थक होते. औश्याचे पहिले नगराध्यक्ष म्हणून त्यांचे कार्य उल्लेखनीय आहे. जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून त्यांनी काम केले. केंद्रीय राज्यमंत्र्याचा दर्जा असलेल्या भेलच्या संचालकपदीही ते होते. अलिकडच्या काळात पाणीटंचाईवर मात करण्यासाठी निर्माण करण्यात आलेल्या जलयुक्त लातूर या अराजकीय फोरममध्येही त्यांचे मोलाचे योगदान होते. गाव तिथे ग्रंथालय निर्माण होण्यासाठी लातूर जिल्ह्यात त्यांनी चळवळ राबविली. त्यांच्या निधनामुळे लातूर जिल्ह्याच्या राजकीय, सामाजिक क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.
दरम्यान, अॅड. त्र्यंबकदास झंवर यांच्या पार्थिवावर औसा येथे दुपारी २ वा .अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले.