लातूर : जिल्ह्यात करजगाव, हरंगुळ बु,खरोळा,अलमला आदी गावातल्या शेतकऱ्यांनी रेशीम शेती सुरू केली असून जवळपास ४५६ एकरवर लागवड झाली आहे. एकरी अडीच ते तीन लाखांपर्यंतचे वार्षिक उत्पन्न मिळत असल्याने रेशीम शेतीकडे कल वाढत आहे. त्यामुळे लातूर येथे कोष विक्रीसाठी बाजारपेठ होणार असून लिलाव पद्धतीने ही बाजारपेठ लवकरच सुरू होणार असल्याची माहिती जिल्हा रेशीम विकास अधिकारी एस बी वराट यांनी केली आहे.
रेशीम शेतीचा प्रयोग समूह शेती म्हणूनही केला जात आहे. दोन अडीच हजार शेतकरी या शेतीकडे वळले आहे. एकदा तुतीची लागवड केल्यानंतर दहा ते पंधरा वर्षे पुन्हा लागवड करण्याची गरज लागत नाही. त्यानुसार लातूर जिल्ह्यातील खरोळा,हरंगुळ, आलमला, करजगाव आदी शेत शिवारमध्ये लागवड झाल्यामुळे कोष विक्रीला बाजारपेठ आवश्यक आहे. मराठवाड्यात बीड, परभणी येथे कोष विक्रीसाठी बाजारपेठेची व्यवस्था करण्यात आली आहे. आता लातूर जिल्ह्यात लागवड वाढल्यामुळे उत्पन्न वाढत आहे. त्यामुळे कोष विक्रीसाठी बाजारपेठेला मंजुरी मिळाली आहे.
मनरेगा योजनेअंतर्गत तीन वर्षात एक एकराच्या मर्यादित तीन लाख ५८ हजार रुपये अनुदान रेशीम लागवडीसाठी आहे. दरवर्षी नोव्हेंबर, डिसेंबरमध्ये महरेशीम अभियान राबविण्यात येते. या काळात लागवडीसाठी नोंदणी करणे आवश्यक आहे. नर्सरी द्वारे लागवड व कोष उत्पन्नाचे प्रशिक्षण रेशीम कार्यालयाकडून देण्यात येते. ७५ टक्के अनुदानावर अनुदानावर अंडी वाटप केले जाते. पहिल्या वर्षी दोन व दुसऱ्या वर्षांपासून दरवर्षी चार ते पाच पिके घेतली जातात. त्यामुळे उत्पादन दुप्पट होते.
तुतीच्या पाल्यावर कीटकांचे संगोपन...एक एकर तुती लागवड करणे आवश्यक आहे. त्यासाठी अनुदान आहे. तुतुच्या पाल्यावर रेशीम कीटकांचे संगोपन करण्याकरिता वीस बाय पन्नास फुटाचे कीटक संगोपन ग्रह उभारावे लागते. या योजनेचा समावेश महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेत करण्यात आला आहे. अल्पभूधारक व जॉब कार्ड धारक शेतकऱ्यास या योजनेचा लाभ घेता येतो.