लातूर जिल्ह्यात ७८५ ग्रामपंचायती आहेत. त्यापैकी ४०८ ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम राबविला जात आहे. त्यासाठी १ हजार ३४१ प्रभाग संख्या असून, १ हजार ४३२ मतदान केंद्राचे नियोजन करण्यात आले आहे. या प्रक्रियेतून ३ हजार ५४८ सदस्यांची निवड केली जाणार आहे. ग्रामपंचायत निवडणुकीसाठी ३ लाख ५६ हजार ५२५ पुरुष तर ३ लाख १५ हजार ५४३ महिला मतदार आहेत. लातूर तालुक्यातील ६४ ग्रामपंचायतींसाठी १ लाख २३ हजार ३२०, रेणापूर २८ ग्रामपंचायतींसाठी ३७ हजार २७६, औसा ४६ ग्रामपंचायतींसाठी ८९ हजार ८६४, निलंगा ४८ ग्रामपंचायतींसाठी ९१ हजार १८, शिरूर अनंतपाळ २७ ग्रामपंचायत ३८ हजार ९७७, देवणी ३४ ग्रामपंचायत ४७ हजार ७९३, उदगीर ६१ ग्रामपंचायतींसाठी १ लाख ३ हजार ५०, अहमदपूर ४९ ग्रामपंचायतींसाठी ५८ हजार २३१, जळकोट २७ ग्रामपंचायतींसाठी ३३ हजार ७०९ तर चाकूर तालुक्यातील २४ ग्रामपंचायतींसाठी ४८ हजार ८३० मतदार आपला हक्क बजावणार आहेत. २३ डिसेंबरपासून ग्रामपंचायत निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत.
३० डिसेंबर अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख असून, १५ जानेवारी रोजी १ हजार ४३२ मतदान केंद्रांवर मतदान होणार आहे. तर १८ जानेवारी रोजी मतमोजणी होणार आहे.
अर्ज दाखल करण्यापूर्वी हे नक्की करा
सर्व उमेदवारांना संगणक प्रणालीद्वारेच नामनिर्देशनपत्र व घोषणापत्र भरणे आवश्यक आहे. ग्रामपंचायतीमधील महा-ऑनलाईन केंद्र, सेतू सुविधा केंद्र आदी ठिकाणी उमेदवारांना ऑनलाईन नामनिर्देशनपत्र भरण्याबाबत सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. प्रत्येक तहसील कार्यालयात मदतीसाठी कक्ष आहेत.
७ ते ९ सदस्य संख्या असलेल्या ग्रामपंचायत सदस्यांकरिता २५ हजार, ११ ते १३ सदस्य असलेली ग्रामपंचायत प्रति सदस्य ३५ हजार तर १५ ते १७ सदस्य असलेल्या ग्रामपंचायतीमधील उमेदवार सदस्यांकरिता ५० हजार रुपये निवडणूक खर्चाची मर्यादा ठरवून देण्यात आली आहे.