राजकुमार जाेंधळे, उदगीर (जि. लातूर) : तालुक्यातील शिरोळ-जानापूर येथील महाराष्ट्र-कर्नाटक राज्य सीमेवरील चेकपोस्टवर कर्नाटक राज्याच्या दुचाकीवरून एका बॅगमधून वाहतूक करण्यात येणारी तब्बल सात लाखांची रक्कम एस.एस.टी.च्या पथकाने शुक्रवारी दुपारी ४ वाजता पकडली. यावेळी राेकड जप्त केली असून, ती एका लाेखंडी पेटीत सील केली आहे. उदगीर येथील निवडणूक कार्यालयात रात्री ८ वाजता ती लाेखंडी पेटी जमा करण्यात आली आहे.
पाेलिसांनी सांगितले, लाेकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यासह जिल्ह्यांच्या, राज्याच्या सीमेवर चेक पाेस्टची स्थापना केली आहे. या चेकपाेस्टवर दिवस-रात्र वाहनांची कसून चाैकशी, तपासणी केली जात आहे. याचे व्हीडिओ चित्रीकरणही केले जात आहे. शुक्रवारी दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास उदगीर येथून कर्नाटकातील बावलगावकडे दुचाकीवरून काहीजण निघाले हाेते. दरम्यान, शिरोळ जानापूर येथील महाराष्ट्र-कर्नाटक राज्य सीमेवरील चेकपोस्टवर दुचाकीवरील बॅगची तपासणी केली जात हाेती. यावेळी संदीप स्वामी (रा. बावलगाव ता. औराद बाऱ्हाळी जि. बिदर) यांच्याकडून सात लाख रुपयांची राेकड जप्त करण्यात आली. त्यामध्ये ५०० रुपयांच्या १ हजार ४०० नोटा एसएसटीच्या पथकाने ताब्यात घेतल्या आहेत.
याबाबतची माहिती गटविकास अधिकारी प्रवीण सुरडकर यांना देण्यात आली. त्यांनी घटनास्थळी तातडीने भेट देत पंचनामा केला. जप्त केलेली राेकड शुक्रवारी रात्री ८ वाजता लोखंडी पेटीमध्ये जमा करून, त्या लोखंडी पेटीला सील करण्यात आले. उदगीर येथील निवडणूक कार्यालयात ही पेटी जमा करण्यात आली आहे. ही कारवाई एस.एस. टी. पथकाचे पी.एम. हेडगापुरे, संजयसिंग चव्हाण, व्ही.आर. वाघमारे, उदगीर शहर पोलिस ठाण्याचे पोहेकॉ. पाटील यांच्या पथकाने केली.