लातूर : पावसाळ्यात वार्षिक सरासरीएवढाही पाऊस न झाल्याने जिल्ह्यास हिवाळ्यातच पाणीटंचाईचे चटके बसू लागले आहेत. दरम्यान, आगामी सहा महिन्यात जिल्ह्यातील १ हजार ९७ गावे आणि ३२२ वाड्यांना पाणीटंचाई जाणवण्याची भीती व्यक्त होत असून जिल्हा प्रशासनाने टंचाई निवारणार्थ ३९ कोटी ४८ लाख ६३ हजार रुपयांचा आराखडा तयार केला आहे.
गत पावसाळ्यात अल्प पर्जन्यमान झाले. त्यामुळे जिल्ह्यातील मांजरा, तेरणा या प्रमुख नद्यांसह इतर नद्या वाहिल्या नाहीत. तसेच ओढे- नाले खळाळले नाहीत. परिणामी, जिल्ह्यातील आठ मध्यम प्रकल्पात अपेक्षित जलसाठा झाला नाही. शिवाय, साठवण तलाव, विहिरींच्या पाणीपातळीत वाढ झाली नाही. दरवर्षी परतीचा पाऊस होतो. त्यामुळे यंदाही आशा होती. परंतु, परतीचा पाऊस झाला नाही. त्यामुळे जिल्ह्यातील काही गावांना डिसेंबरपासूनच पाणीटंचाईच्या झळा बसण्यास सुरुवात झाली. आगामी काळात तीव्र पाणीटंचाईची समस्या उद्भवेल म्हणून जिल्हा प्रशासनाने सर्व प्रकल्पातील पाणीसाठे पिण्यासाठी आरक्षित केले आहेत.
जानेवारी ते मार्चअखेरसाठी २० कोटींचा आराखडा...
जानेवारी ते मार्चअखेरपर्यंत जिल्ह्यातील १ हजार ९७ गावे आणि २५२ वाड्यांना पाणीटंचाई जाणवण्याची भीती आहे. टंचाई निवारणासाठी १९ काेटी ६३ लाख २० हजार रुपयांचा आराखडा तयार करण्यात आला आहे. तसेच १ एप्रिल ते ३० जून या कालावधीसाठी १९ कोटी ८५ लाख ४३ हजारांचा आराखडा तयार करण्यात आला आहे. दरम्यान, जिल्ह्यात अद्याप एकाही ठिकाणी अधिग्रहणाद्वारे पाणीपुरवठा सुरु नाही.
मार्चपर्यंत १४६ गावांना टँकरची आवश्यकता...उपाययोजना - उपाययोजनेअंतर्गतची गावे
टँकरद्वारे पाणीपुरवठा - १४६अधिग्रहण - ५५८
विंधन विहीर घेणे - २८१नळ योजना दुरुस्ती - ४७
तात्पुरती पुरक नळ योजना - २८विहिरीतील गाळ काढणे - ३६
एकूण - १०९७एप्रिल ते जून दरम्यानच्या उपाययोजना...उपाययोजना - गावे
टँकरद्वारे पाणीपुरवठा - ३१८अधिग्रहण - ६०७
विंधन विहीर घेणे - ४६एकूण - ९७१
१२ गावांना टंचाईच्या झळा...
डिसेंबरपासून जिल्ह्यातील १२ गावे आणि ३ वाड्यांना पाणीटंचाईच्या झळा जाणवत आहेत. त्यात लातूर तालुक्यातील ४, औसा- २, अहमदपूर- ३ गावे आणि ३ वाड्या, शिरुर अनंतपाळ व जळकोट तालुक्यातील प्रत्येकी एका गावास पाणीटंचाई जाणवत आहे. या गावांनी अधिग्रहणासाठी पंचायत समितीकडे प्रस्ताव सादर केले होते. पंचायत समितीने तहसील कार्यालयास प्रस्ताव सादर केले आहेत. अद्यापही त्यास मंजूरी देण्यात आली नाही.
यंदा अधिक टंचाईची भीती...आगामी काळात पाणीटंचाई अधिक प्रमाणात जाणवण्याची भीती आहे. त्यामुळे जानेवारी ते जून या सहा महिन्यांत उपाययोजना राबविण्यासाठी ३९ कोटी ४८ लाख ६३ हजार रुपयांचा टंचाई निवारणार्थ आराखडा तयार करण्यात आला आहे. दरम्यान, प्रशासनाने जलसाठे पिण्यासाठी आरक्षित केले आहेत. नागरिकांची पाण्याचा जपून वापर करावा, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा व लघु पाटबंधारे विभागाकडून करण्यात आले आहे.