लातूर : राज्याला शिक्षणाचा लातूर पॅटर्न देणाऱ्या लातूर शहरातील शिवछत्रपती शिक्षण संस्थेच्या राजर्षी शाहू महाविद्यालयाने स्वत:च्या अधिकारातील व्यवस्थापन कोटा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे़ दरम्यान, शिक्षण संस्थांना पाच टक्के प्रवेश कोट्यातून भरण्याची संमती शासनमान्य असताना संस्थेने घेतलेला निर्णय महत्वपूर्ण पायंडा ठरणार आहे़
संस्थेचे अध्यक्ष माजी खासदार डॉ़ गोपाळराव पाटील व सचिव प्राचार्य अनिरूद्ध जाधव यांनी शनिवारी संस्थेच्या कार्यालयात आयोजित पत्रपरिषदेत ही माहिती दिली़ ते म्हणाले, राजर्षी शाहू महाविद्यालयात प्रवेश मिळविण्यासाठी संबंध महाराष्ट्रातून विद्यार्थी येतात़ यापूर्वीही ११ वी प्रवेशासाठी जितक्या जागा उपलब्ध आहेत. त्यातील ९५ टक्के जागा दहावीच्या गुणवत्तेवरच भरल्या जात होत्या़ मात्र शासन नियमानुसार पाच टक्के जागा व्यवस्थापन कोट्यातून भरण्याचा अधिकार संस्थेकडे होता़ ज्यासाठी लोकप्रतिनिधी, विविध क्षेत्रातील मान्यवर, अधिकारी यांच्याकडून मोठ्या प्रमाणावर शिफारशी येतात़ संस्था सदस्यही शिफारशी करतात़आता व्यवस्थापन कोटाच रद्द केल्याने कोणाच्याही शिफारशी स्वीकारल्या जाणार नाहीत़
सर्वच शाखांना नियम लागू११वी विज्ञानसह कला, वाणिज्य, (राज्यमंडळ, सीबीएसई) तसेच वरिष्ठ महाविद्यालयातील पाच टक्के व्यवस्थापन कोटा भरला जाणार नाही़ त्यामुळे पालकांनी शिफारशी आणू नयेत़ तसेच लोकप्रतिनिधी व मान्यवरांनी शिफारशी करू नयेत व संस्थेला सहकार्य करावे, असे आवानही डॉ़ गोपाळराव पाटील व प्राचार्य अनिरूद्ध जाधव यांनी केले़
संस्थाचालकांनी सोडला स्वत:चा अधिकारसामाजिक, राजकीय संघटनांचा प्रवेशासाठी होणारा आग्रह पूर्ण करता येत नाही़ एकंदर गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि पारदर्शक प्रवेश प्रक्रिया हे संस्थेचे प्रारंभापासूनचे धोरण आहे़ त्याला अनुसरूनच संस्था चालकांनी स्वत:चाही अधिकार सोडला आहे़ त्यामुळे १०० टक्के प्रवेश प्रक्रिया गुणवत्तेवर व शासनाच्या धोरणानुसार राहील, असे प्राचार्य जाधव म्हणाले.