मुंबई - मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी गुढी पाडव्यातील मेळावा सभेत राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवारांवर घणाघाती आरोप केले होते. राज्यात राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर जातीयवाद वाढल्याचं ते म्हणाले. विशेष म्हणजे ठाण्यातील सभेतही त्यांनी राष्ट्रवादीवर टीका करताना पक्षात जातीयवाद असल्याचा पुनरुच्चार केला. मात्र, केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री आणि रिपाइंचे प्रमुख रामदास आठवले यांन राज ठाकरेंच्या विधानात तथ्य नसल्याचं म्हटलं आहे. शरद पवार हे जातीयवादी नाहीत हा आपला अनुभव आहे, असे आठवले यांनी येथे पत्रकार परिषदेत सांगितले. मशिदीवरील भोंगे काढण्याची जी भूमिका राज ठाकरे यांनी घेतली त्याच्याशी रिपब्लिकन पक्ष सहमत नाही. मंदिरावर भोंगे लावायचे असतील आणि हनुमान चालिसा म्हणायचे असेल तर म्हणा, पण मशिदीवरील भोंगे काढण्याचा आग्रह अजिबात चालणार नाही. संविधानाने तो अधिकार दिला असून महाराष्ट्रात लोकशाही आहे, असेही आठवलेंनी म्हटले.
रिपब्लिकन पक्षातील सर्व गट-तट बंद होऊन एकच पक्ष निर्माण होणे आवश्यक असल्याचेही आठवलेंनी म्हटले. विशेष म्हणजे प्रकाश आंबेडकर पुढे आल्यास तेच या पक्षाचे अध्यक्ष असतील. आपण कोणतेही पद घेऊन काम करू, पण प्रकाश आंबेडकर हे ऐकत नाहीत, असा अनुभवच आठवलेंनी व्यक्त केला.
राज ठाकरेंचा शरद पवारांवर निशाणा
शरद पवार यांच्याकडे घेण्यासारखे अनेक गुण आहेत. मात्र, स्वार्थी राजकारणासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्मानंतर जातीयद्वेष महाराष्ट्रात पसरला, असा पुनरुच्चार राज ठाकरे यांनी केला. प्रत्येक जातीचा माणूस शिवरायांसाठी, स्वराज्यासाठी लढला. शिवरायांचा इतिहास घराघरात पोहोचणे महत्त्वाचे आहे. मात्र, तो कुणी लिहिला, यावरून राजकारण केले गेले. जाती-पातीत महाराष्ट्र अडकला गेला. महाराष्ट्राला कुणीही हरवू शकत नाही, मात्र राज्यातील जातीचे राजकारणच आपल्याला हरवेल, अशी खंत राज ठाकरे यांनी व्यक्त केली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्मानंतरच अनेक संघटना स्थापन झाल्या. महाराष्ट्रात जाती होत्याच पण राष्ट्रवादीच्या जन्मानंतर जातीयवाद महाराष्ट्रात आला. जातीयद्वेष पसरला, असा मोठा आरोप राज ठाकरे यांनी केला.