निलंगा (जि. लातूर) : लातूर जिल्ह्यास मंजूर झालेला पीकविमा व प्रत्यक्षात मिळालेली रक्कम यातील घोळाची चौकशी करण्यात यावी, यासह अन्य विविध मागण्यांसाठी शिवसेनेच्या वतीने शहरातील छत्रपती शिवाजी चौकात शनिवारी दुपारी रास्तारोको आंदोलन करण्यात आले़
शिवसेनेचे जिल्हा सहसंपर्कप्रमुख अभय साळुंके यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झाले़ यावेळी अमोल नवटक्के, प्रकाश गायकवाड, विशाल नेलवाडे, गजानन बु-हाणपूरकर, माजी पंचायत समिती सदस्य सुरेशप्पा धुमाळ, औदुंबर पांचाळ, मुकेश सुडे, अमोल जाधव, प्रदीप सागावे, तुराब बागवान, अनिल आरीकर आदी उपस्थित होते़ बोगस बियाणे कंपन्यांवर कारवाई करण्यात यावी तसेच दुबार पेरणीसाठी शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्यात यावी़ तूर, हरभरा खरेदी केंद्रावर हा शेतमाल विक्री न झालेल्या शेतकऱ्यांना तात्काळ फरकाची रक्कम द्यावी़ तसेच ज्या शेतकऱ्यांनी आपल्या आर्थिक अडचणींमुळे हा शेतमाल खुल्या बाजारपेठेत विक्री केला आहे, अशाही शेतकऱ्यांना या अनुदानाचा लाभ द्यावा़ पीकविमा भरण्यासाठी आॅनलाईन ७/१२ ची अट रद्द करुन लेखी ७/१२ साठी परवानगी द्यावी़ अंबुलगा शेतकरी सहकारी साखर कारखाना तात्काळ सुरु करावा, अशा विविध मागण्या करण्यात आल्या़
भाजपाकडून शेतकऱ्यांची फसवणूक़सातत्याने खोटी आश्वासने देऊन सत्ता मिळविलेल्या भाजपाने पीकविमा, कर्जमाफी, हमीभावात शेतकऱ्यांची घोर निराशा केली आहे़ प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या हाती काहीही पडले नाही़ त्यामुळे शेतकऱ्यांची फसवणूक होत आहे, असा आरोप शिवसेनेचे जिल्हा सहसंपर्कप्रमुख अभय साळुंके यांनी केला़
तासभर वाहतूक ठप्प़शहरातील छत्रपती शिवाजी चौकात हे आंदोलन करण्यात आले़ त्यामुळे एक तासापेक्षा अधिक वेळ वाहतूक ठप्प झाली होती़ परिणामी, वाहनांच्या रांगा लागल्या होत्या़ यावेळी भाजपाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली़