अहमदपूर (जि. लातूर) : चलेजाव चळवळीतील सहभागी राहिलेले १९४५ मध्ये एमबीबीएस पदवी मिळविणारे डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज यांची ओळख विज्ञाननिष्ठ संत अशी आहे. त्यांचे अनंतचतुर्दशीला लिंगैक्य झाल्यानंतर भक्तिस्थळ शोकसागरात बुडाले आहे.
लिंगायत समाजाचे श्रद्धास्थान असलेले डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज यांनी लाहोर विद्यापीठातून वैद्यकीय पदवी मिळविल्यानंतर त्यांनी सामाजिक, धार्मिक कार्यात सहभाग घेतला. १९३४ साली त्यांच्याकडे मडीवाळअप्पा मठाची सूत्रे हाती आली. वारद पाठशाळा, सोलापूर येथे त्यांचा अभ्यास झाला होता. वीरमठ संस्थानचे उत्तराधिकारी झाल्यानंतर पहिल्यांदा श्रावणमास तपोअनुष्ठान कपिलधार येथे झाला. गत आठवड्यातही त्यांनी तपोअनुष्ठान केले होते.
उर्दू, पारसी, कन्नड, पंजाबी, संस्कृत, मराठी, हिंदी, इंग्रजी आदी भाषा त्यांना अवगत होत्या़ त्यांनी संपादीत केलेला परमरहस्य ग्रंथ भक्तांना उपलब्ध करुन देण्यात आला आहे़ त्यांनी लिंगायत समाजाच्या भजनाची पद्धती व कीर्तनकार परंपरा पुनर्जीवित केली. महाराजांनी संपूर्ण राज्यभर मन्मथ ज्योत रथयात्रा आयोजित केली होती. १९५५ पासून श्रीक्षेत्र कपिलधार पदयात्रेची सुरुवात केली. त्यांनी हिमालयात योगसाधनाही केली आहे. नुकताच त्यांचा जन्मशताब्दी सोहळा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या उपस्थितीत झाला होता.
धार्मिक कार्यातून समाजविकास देशाच्या स्वातंत्र्यलढ्यामध्ये त्यांचा सक्रिय सहभाग होता. १९४२ च्या चलेजाव आंदोलनातही त्यांनी सहभाग नोंदविला होता. त्यांना दोन वेळा कारावास भोगावा लागला. धार्मिक कार्यातून समाजाचा विकास घडवून आणण्याचे काम महाराजांनी केले़ महात्मा बसवेश्वर आणि संत शिरोमणी मन्मथ महाराजांच्या समतेच्या मार्गावर समाजाला घेऊन जाण्यासाठी त्यांनी अध्यात्माचा अवलंब केला़ अंधश्रद्धा, जातीद्वेष या गोष्टींना त्यांनी कधीच थारा दिला नाही़ व्यसनमुक्ती, आध्यात्मिक कार्य, वृक्षारोपण, रक्तदान शिबीर, वृक्षसंगोपन, सर्वधर्मीय विवाह सोहळा आदी उपक्रम त्यांनी राबविले़ सामाजिक व राष्ट्रीय सलोखा राखण्याचे काम त्यांनी केले़