अहमदपूर (जि. लातूर) : राष्ट्रसंत डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराजांनी संजीवन समाधीचा निर्णय घेतल्याची अफवा सर्वत्र पसरल्याने शुक्रवारी अहमदपूर येथील भक्तीस्थळावर हजारो भक्तांनी गर्दी केली. दरम्यान, स्वत: डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराजांनी समोर येऊन माझी प्रकृती उत्तम आहे, तुम्ही काळजी करू नका, असे सांगितल्यानंतर भक्तगण आपापल्या घराकडे परतले.
राष्ट्रसंत डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराजांचे वय १०४ वर्षे आहे. महाराजांनी संजीवन समाधी घेण्याचा निर्णय घेतला असून, ते अन्न-पाणी ग्रहण करीत नाहीत अशी चुकीची माहिती सामाजिक माध्यमांमधून पसरली. दरम्यान, शुक्रवारी असंख्य भक्त अहमदपूर शहराजवळील भक्तस्थळावर पोहोचले. त्यावेळी स्वत: महाराजांनी सांगितले, मी अध्यात्माबरोबर विज्ञान मानणारा आहे. जेव्हा माझे शरीर कार्य थांबेल, त्यावेळी माझी समाधी भक्ती स्थळावरील नियोजित ठिकाणी व्हावी, असे यापूर्वीच सांगितले आहे. दरम्यान, महाराज अन्न व पाणी ग्रहण करीत आहेत. तसेच त्यांना उपचारासाठी नांदेडला रुग्णालयात घेऊन जात असल्याचे वीरमठ संस्थानने सांगितले.
उत्तराधिकारी म्हणून राजशेखर स्वामीशुक्रवारी दुपारी भक्तांसमक्ष येऊन डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज यांनी वीरमठ संस्थानचा उत्तराधिकारी व वारस म्हणून राजशेखर विश्वंभर स्वामी यांचे नाव जाहीर केले. दरम्यान, उपचारासाठी नांदेडला निघाले असताना रस्त्याने प्रत्येक गावातील भक्त रस्त्याच्या दुतर्फा थांबून आशीर्वाद घेत होते.