लातूर : येथील बसस्थानकातून अंबाजोगाईच्या दिशेने मार्गस्थ झालेली पाथरी आगाराची शिवशाही बस काळी-पिवळी जीपवर पाठीमागून जोराने आदळली. या अपघातात जीपमधील तीन प्रवासी जखमी झाले आहेत. ही घटना रेणापूर परिसरात घडली. याबाबत रेणापूर पोलीस ठाण्यात शनिवारी बस चलकाविरोधत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी सांगितले, लातूरकडून अंबाजोगाईकडे निघालेली परभणी जिल्ह्यातील पाथरी आगाराची शिवशाही बस ( एम.एच. ०६ बी.डब्ल्यू. ०८९३) रेणापूर नजीक आली. समोर काळी पिवळी (एम.एच. ४४/ ००१६ ) जीप धावत होती. रेणापूर येथे असलेला स्पीड ब्रेकर समोर असल्याने जीप चालकाने आपला वेग कमी केला. यावेळी पाठीमागे असलेली शिवशाही बस जीपवर जोराने आदळली. एअर ब्रेक निकामी झाल्याने बस थांबवता आली नाही, यातूनच हा अपघात झाला असे, बस चालकाने पोलिसांना सांगितले आहे. या अपघातात एकाच पाय फ्रक्चर तर अन्य दोन प्रवासी जखमी झाले आहेत. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.
याबाबत संजय काशीनाथ काळे (वय ४० रा. वरपगाव, ता. अंबाजोगाई जि. बीड) यांनी दिलेल्या तक्रारीवरून शिवशाही बस चलकाविरोधत रेणापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक राजकुमार गुळभेले करत आहेत.
तांत्रिक बिघाडाने झाला अपघात...कोरोना काळात जवळपास दोन वर्ष जाग्यावरच धूळखात पडून असलेल्या काही बसेस भांगरात निघाल्या. दरम्यान, काही बसेसची दुरुस्ती करुन त्या रस्त्यावर आणल्या जात आहेत. प्रवासात अचानक तांत्रिक बिघाड झाल्याने अशा अपघाताच्या घटना होत असल्याचे एका चालकाने नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर सांगितले.