पाथरुड (जि.धाराशिव) : भूम तालुक्यातील नळी येथील सूर्यभान तरंगे आश्रम शाळेतून २ ऑक्टोबर रोजी नववीच्या वर्गात शिकणारा आशिष बाळू काळे हा विद्यार्थी बेपत्ता झाल्याची घटना दोन दिवसांपूर्वी घडली होती. यानंतर आंबी पोलिसांकडून अज्ञाता विरुद्ध गुन्हा दाखल करून चौकशी सुरू होती. यादरम्यान, शुक्रवारी सायंकाळी त्याचा मृतदेह एका विहिरीत आढळल्याने खळबळ उडाली आहे.
नळी येथील शाळेतून बेपत्ता झालेल्या विद्यार्थ्याच्या नातेवाईकांकडून ४ ऑक्टोबर रोजी शाळेत येऊन आमचा मुलगा सापडून द्या, अशी मागणी करण्यात येत होती. यावेळी आंबी येथील पोलीस पथक शाळेमध्ये कसून चौकशी करत होते. परंतु, दोन दिवसापासून बेपत्ता असलेल्या विद्यार्थ्यांचा शोध लागत नव्हता. अखेर शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास नळी वडगाव शिवारातील एका विहिरीत बेपत्ता झालेल्या या विद्यार्थ्यांचा मृतदेह आढळून आला असून, पोलीस पुढील तपास करीत आहेत. मात्र, रात्री उशिरापर्यंत मुलाच्या नातेवाईकांकडून दोषीवर कारवाई होईपर्यंत विहिरीतून मृतदेह बाहेर काढण्यास विरोध होत होता.