उदगीर : येथील बिदर वळण रस्त्यावर असलेल्या एका स्विमिंग पूलमध्ये पोहण्यासाठी गेलेल्या १६ वर्षीय शाळकरी मुलगा मयुरेश राठोड याचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना बुधवारी दुपारी १२:३० वाजेच्या सुमारास घडली. याबाबत मुलाच्या वडिलांनी स्विमिंग पुलचे मालक व व्यवस्थापक यांच्या विरोधात उदगीर ग्रामीण पोलिसात तक्रार दिली आहे.
उदगीर शहरातील बिदर रिंग रोडवर असलेल्या एका स्विमिंग पूलमध्ये बुधवारी दुपारी १२:३० वाजेच्या सुमारास विजयकुमार गोविंद राठोड (वय ४२ रा. पंचशीलनगर उदगीर)हे त्यांचा मुलगा व इतर चार जण असे पाच जण लहान मुलांना घेऊन स्विंमिंग पुलाच्या ठिकाणी गेले होते. प्रत्येकी १०० रुपये याप्रमाणे त्यांनी ५०० रुपये व्यवस्थापकाकडे जमा केले. मुलांना पोहण्यासाठी सोडून ते बाजूला बसले असता त्यांचा मुलगा मयुरेश हा पाण्यात खोलीचा अंदाज न आल्यामुळे बुडाला. तेथे उपस्थित असलेल्या नागरिकांनी मुलाला बाहेर काढून त्यास शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्या मृत घोषित केले.
याबाबत विजयकुमार राठोड यांनी उदगीर ग्रामीण पोलिसाकडे जबाब देऊन स्विमिंग पूलचे मालक शिवशंकर प्रभूआप्पा चिल्लरगे व व्यवस्थापक शिवकुमार रमेश चाकुरे हे स्विमिंग पुलाच्या ठिकाणी पोहता न येणाऱ्या मुलासाठी कोणतीही साधने किंवा जीव रक्षक ठेवला नाही. पाणी कोणत्या ठिकाणी किती आहे हे कळण्यासाठी फलक लावलेले नाहीत. त्यामुळे स्विमिंग चालक व व्यवस्थापक यांच्या विरोधात कारवाई करण्याची मागणी केली आहे. याबाबत ग्रामीण पोलिसात गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरु आहे.