लातूर : गेल्या काही दिवसांपासून लातूर शहरात सर्वच रक्तगटांचा तुटवडा निर्माण झाला आहे. उन्हाच्या तीव्रतेमुळे रक्तदाते मिळत नाहीत. शिवाय उन्हाळा असल्यामुळे काही दिवसांपासून रक्तदान शिबिरही होत नाही. त्यामुळे रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. परिणामी, रुग्ण नातेवाइकांना रक्त मिळविण्यासाठी धावपळ करावी लागत आहे. डोनर हिस्ट्री पाहून रुग्ण नातेवाइकांच्या मागणीनुसार ब्लड बँका रक्त मिळवून देण्याचा प्रयत्न करीत आहेत. विशेष म्हणजे लातूर जिल्ह्यात थॅलेसेमियाचे दीडशे ते दोनशे रुग्ण आहेत. या रुग्णांना नेहमीच रक्ताची गरज लागते. त्यांच्यासाठीही सध्या उणीव भासत आहे.
लातूर शहरामध्ये जवळपास सात ते आठ रक्तपेढ्या आहेत. त्यात सिव्हिल रक्तपेढी, भालचंद्र रक्तपेढी, सरस्वती रक्तपेढी, माउली ब्लड बँक, संजीवनी ब्लड बँक, लातूर ब्लड बँक, अर्पण ब्लड बँक या रक्तपेढ्यांचा समावेश आहे. या ब्लड बँकांशी संपर्क साधला असता जवळपास सर्वच रक्तगटांचा तुटवडा असल्याचे सांगण्यात आले.
का आहे रक्ताचा तुटवडा?सध्या उन्हाळा आहे. उन्हाची तीव्रता इतकी प्रचंड आहे की, दुपारच्या सुमारास रस्ते निर्मनुष्य होत आहेत, अशा परिस्थितीत रक्तदान शिबिरे घेतली जात नाहीत. सामाजिक संस्था, संघटनांकडून रक्तदान शिबिरांचे आयोजन केले जात नाही, त्यामुळे शहरात रक्ताचा तुटवडा आहे. उन्हाळा असल्यामुळे शाळा, महाविद्यालयांना सुट्टी आहे. त्यामुळे कॅम्पही होत नाहीत.
डोनरला शोधून आणावे लागते.....सध्या लातूरच्या तापमानाचा पारा ४० ते ४४ अंशांवर आहे. त्यामुळे ऊन लागून आजारी पडणाऱ्या रुग्णांची संख्याही मोठी आहे. थॅलेसेमिया रुग्ण, डिलिव्हरी रुग्ण तसेच अन्य गंभीर आजारांच्या रुग्णांना रक्ताची गरज लागते. अशावेळी ब्लड बँकेकडून डोनरचा शोध घेतला जातो आणि संबंधित रुग्ण नातेवाइकांना मागणीनुसार रक्तपुरवठा करण्याचा प्रयत्न केला जात आहे. एवढी टंचाई सध्या रक्तगटाची आहे. उन्हाची तीव्रता कमी झाल्याशिवाय तुटवडा कमी होणार नाही, असे चित्र सध्या दिसते.
लवकरच टंचाई दूर होऊ शकतेलातूर शहरामध्ये गेल्या पंधरा दिवसांपासून रक्ताची टंचाई आहे. त्यामुळे मागणीनुसार पुरवठा होत नाही. खूपच टंचाई आहे. दरवर्षी एप्रिल, मे आणि जून या तीन महिन्यांमध्ये रक्ताची टंचाई असते. यंदा उन्हाची तीव्रता अधिक असल्यामुळे टंचाईचे प्रमाण अधिक आहे. पुढील पंधरा दिवसांत ही टंचाई कमी होईल. लवकरच टंचाई दूर होऊ शकते.- विकास करंजे, सरस्वती रक्तपेढी, लातूर