लातूर : सोयाबीनला हमीभावाएवढाही दर मिळत नाही. दिवसेंदिवस भाव घसरत आहे. तसेच पीकविम्याचा प्रश्न कायम आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात आहे. बळीराजाच्या प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी शेतकरी संघटनेच्या वतीने गुरुवारी जिल्हा कृषी महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी गळ्यात पोस्टर घालून मूक आंदोलन करण्यात आले.
शेतकरी संघटनेचे राजेंद्र मोरे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. यात राजीव कसबे, शाम जाधव, बब्रुवान सूर्यवंशी, हनीफ शेख, इमाम सय्यद, अंगद पवार, दत्ता किणीकर, दत्ता गायकवाड, अमोल सूर्यवंशी, आप्पाराव हुडे, हणमंत भडंगे, चंदर देवकर, माणिक कोळी, हणमंत सुरवसे, मुक्ताराम काळे, व्यंकट चलवाड, रणजित पारवे, शरद रामशेटे, नामदेव माने, सावन गवळी, सुरेश सूर्यवंशी आदी सहभागी झाले होते.
शहरातील टाऊन हॉल येथे कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) आणि जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी कार्यालयाच्या वतीने जिल्हास्तरीय कृषि महोत्सव होत आहे. यावेळी हे आंदोलन करण्यात आले. यावेळी शेतकरी नेते राजेंद्र मोरे आणि राजीव कसबे यांनी सोयाबीनला हमीभावापेक्षा अधिक दर देण्यात यावा, अशी मागणी करीत पीकविमासंदर्भातही मागणी केली.