रेणापूर : तालुक्यातील निवाडा गावातील महिलांनी दोन महिन्यापूर्वी अवैध दारु विक्री विरोधात गावात मोर्चा काढून विरोध केला होता. त्यानंतर अवैध दारु विक्री बंद होणे अपेक्षित होते. परंतु, तसे न होता, पुन्हा अवैध दारु विक्री जोमात सुरु असून, त्यामुळे मद्यपीचा गोंधळ सुरुच आहे. यामुळे अवैध दारु विक्री बंद करा या मागणीसाठी महिलांनी गुरुवारी थेट तहसिलदारांचे दालन गाठले. गावातील दारू बंद करून आमचे संसार वाचवा अशी मागणी केली.
निवाडा येथे दारू विक्रीमुळे अनेक कुंटुबाचे संसार उघड्यावर आले आहेत. व्यसनामुळे अनेकांचे मुल-मुली शिक्षणापासून वंचित आहेत. गावातील महिलांनी दारू बंद करावी असा ठाराव ग्रामसभेत मांडला होता. त्यानुसार ग्रामपंचायतीनेही ठराव घेतला. तसेच संबधितांना वारंवार निवेदने दिली. मात्र उपयोग झाला नाही. त्यामुळे येथील महिलांनी गुरुवारी तहसील कार्यालय गाठले व तहसीलदार यांना निवेदन देऊन आपली कैफीयत मांडली. गावलील बेकायदेशीररित्या होणारी दारुविक्री बंद करावी अशा मागणीचे निवेदन तहसीलदार यांच्यासह जिल्हा पोलिस अधिक्षक, दारूबंदी अधिकारी, पोलिस निरिक्षक यांना देण्यात आले.
याबाबत कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही या महिलांनी दिला आहे. यावेळी पद्मामिबाई गायकवाड, मार्कस गायकवाड, रेखाबाई बड़े, वंदनाबाई बडे, शोभाताई घोडके, बालिकाबाई गायकवाड, विमलबाई गायकवाड, बळीराम गायकवाड, सत्यफुलाबाई गायकवाड, मीनाबाई गायकवाड, सुकुमारबाई गायकवाड, छायाबाई गायकवाड, इंदुबाई वाघमारे, वर्षाबाई गायकवाड, मिनाबाई गायकवाड, विमल गायकवाड, रंजनाबाई गायकवाड यांच्यासह महिला व पुरुष उपस्थित होते.