राजकुमार जाेंधळे, औराद शहाजानी (जि. लातूर) : अवघ्या तीन दिवसांवर बहिणीची लग्न आहे. घरात लगीनघाई सुरू असताना भावाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाल्याची घटना तगरखेडा (ता. निलंगा) येथे बुधवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास घडली. सूरज गाेविंदराव माेरे (वय १८) असे मृत मुलाचे नाव आहे.
पाेलिसांनी सांगितले, निलंगा तालुक्यातील तगरखेडा येथील शेतकरी गोविंदराव मोरे यांचा मुलगा सूरज हा बुधवारी सायंकाळी घरातील गोठ्यात जनावरांना चारा टाकण्यासाठी गेला हाेता. दरम्यान, गोठ्यातील पत्र्यामध्ये विद्युत प्रवाह उतरल्याने त्याला जोराचा धक्का बसला. कुटुंबीयांनी त्याला उपचारासाठी औराद शहाजानी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. मृतदेहाचे विच्छेदन केल्यानंतर बुधवारी रात्री उशिरा अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेने माेरे कुटुंबीयांवर दु:खाचा डाेंगर काेसळला आहे. याबाबत औराद शहाजानी पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. तपास पोलिस हेडकाॅन्स्टेबल लतिफ सौदागर करत आहेत.
सूरज माेरे हा बारावीत हाेता...
औराद शहाजानी येथील महाराष्ट्र विद्यालयात सूरज हा बारावीमध्ये शिक्षण घेत हाेता. बुधवारी सायंकाळी विद्यालयातून घरी नेहमीप्रमाणे आला हाेता. घरातील जनावरांना चारा टाकण्यासाठी गाेठ्यात गेला असता विजेचा धक्का बसला आणि त्यातच मृत्यू झाला.
बहिणीचा विवाह साेहळा येत्या रविवारी...
रविवार, ३० जून राेजी बहिणीचा विवाह साेहळा हाेता. घरात सर्वत्र आनंदाचे वातावरण हाेते. अवघ्या तीन दिवसांवर आलेल्या लग्नसाेहळ्यापूर्वीच भावाचा असा मृत्यू झाल्याने कुटुंबावर दु:खाचा डाेंगर काेसळला आहे.