लातूर : मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील यांची एसआयटीमार्फत चौकशीची मागणी मंत्री, आमदारांनी केली आहे. घटनेचा आदर ठेवत ती मागणी आम्हाला मान्य असून मराठा आंदोलनाला बदनाम करणाऱ्यांचीही एसआयटी चौकशी करण्यात यावी, अशी मागणी लातूर येथील सकल मराठा समाजाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात गुरूवारी करण्यात आली आहे.
अजय महाराज बारसकर हे कुठेही कार्यरत नसताना अचानक मुंबईत प्रसार माध्यमांशी बोलताना आंदोलनाची बदनामी करतात. तसेच संगिता वानखेडे या महिलेस अन्य काही लोक माध्यमांशी बोलताना आंदोनाला बदनाम करीत आहेत, त्यांचा बोलविता धनी कोण, त्यांना आर्थिक मदत कोठून मिळत आहे याचीही चौकशी करण्यात यावी. अंतरवाली सराटी येथे लाठीचार्ज, गोळीबार करण्यास कोण भाग पाडले, बीड जिल्ह्यात राजकीय पक्षाच्या नेत्यांच्या घरावर व व्यावसायिक आस्थापनांवर जिवघेणे हल्ले करून जाळपोळ कोणाच्या सांगण्यावरून केली गेली.
मागील १५ दिवसांत मनोज जरांगे पाटील यांच्यावर काही लोक वैयक्तिक व अत्यंत खालच्या पातळीवर माध्यमातून टीका करीत आहेत, यांच्या मागे कोण आहे, कोणाच्या सांगण्यावरून हे लोक अशी भाषा वापरीत आहेत, याचीही एसआयटी मार्फत चौकशी करण्यात यावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
कोणाच्या सांगण्यावरून गुन्हे दाखल केले२४ फेब्रुवारी संपूर्ण महाराष्ट्रात शांततेत रास्ता रोको आंदोलन सुरू असताना आंदोलनातील व्यक्तींवर जाणून बूजून गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, कोणाच्या सांगण्यावरून असे केले जात आहे याचीही चौकशी व्हायला हवी, अशी मागणी सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आली आहे.