महेश पाळणे
लातूर : शॉर्ट डिस्टन्स प्रकारात उत्कृष्ट स्प्रिंट करून स्केटिंग खेळात मैदान गाजविणारा आंतरराष्ट्रीय खेळाडू अथर्व अतुल कुलकर्णीला नुकताच राज्य शासनाचा मानाचा शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यामुळे जिल्ह्याला स्केटिंग क्रीडा प्रकारात या पुरस्काराच्या रूपाने पहिल्यांदाच मान मिळाला आहे.
निलंगा तालुक्यातील माळेगाव (कल्याणी) येथील मूळचा असलेला अथर्व अतुल कुलकर्णी उत्कृष्ट स्केटिंगपटू. आपल्या कौशल्याच्या जोरावर त्याने अनेक रोड आणि ट्रॅकवरील स्केटिंग स्पर्धा गाजविल्या आहेत. मूळचा लातूर जिल्ह्यातील असलेल्या अथर्वला पुण्याकडून हा पुरस्कार जाहीर झाला आहे. शिक्षणासाठी त्याचे अख्खे कुटुंब पुण्यात स्थायिक झाले. इयत्ता ६ वीपासून स्केटिंगची आवड असल्याने त्याने या खेळात किमया साधली आहे.
आंतरराष्ट्रीय स्तरावर सहा वेळेस सहभागी होऊन त्याने भारताला आशियाई स्पर्धेत कांस्य पदक मिळवून दिले आहे. तसेच राष्ट्रीय स्पर्धेतही त्याने पदकाची लयलूट केली आहे. या कामगिरीच्या जोरावर राज्य शासनाच्या क्रीडा विभागाने त्यास सन २०२०-२१ चा खेळाडू म्हणून पुरस्कार जाहीर केला आहे.
राष्ट्रीय स्पर्धेत १४ सुवर्ण पदके...स्केटिंग खेळातील राष्ट्रीय स्पर्धेत त्याने राज्याला १४ वेळेस सुवर्ण पदक मिळवून दिले आहे. तसेच १२ वेळेस रौप्य तर १४ वेळेस कांस्य पदक मिळवून दिले आहे. २०१८ साली दक्षिण कोरिया येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारताला कांस्य पदक मिळवून दिले आहे. २०१७ साली २६ सेकंद ५३ मायक्रो सेकंदांत ३०० मीटरचे अंतर पार करून शालेय स्पर्धेत राष्ट्रीय रेकॉर्डही त्याने स्थापन केला होता. तसेच जर्मनीत २०१९ साली झालेल्या वर्ल्ड चॅम्पियन स्पर्धेत सिनिअर गटात सातवा येण्याचा बहुमानही पटकाविला होता.
शॉर्ट डिस्टन्सचा बादशहा...
अथर्व स्केटिंग प्रकारात शॉर्ट डिस्टन्स रेस करीत असत. त्याने ३००, ५०० व १००० मीटर रेस करीत अनेक विक्रम स्थापन केले आहेत. वेगवान स्प्रिंटच्या जोरावर त्याने अधिक जोमात अंतर कापत या खेळात भीम पराक्रम केला आहे. सध्या इंग्लंड येथील लिव्हरपूल विद्यापीठात तो फायनान्स विषयात शिक्षण घेत आहे.
खेळणे हा मुख्य हेतू...माझा लहानपणीपासूनच खेळणे हा मुख्य हेतू होता. पुरस्काराची मी अपेक्षाही केली नव्हती. मात्र, हा पुरस्कार मिळाल्याने कुटुंबीयांसह अनेकांना आनंद झाला. यातच माझा आनंद असून मेहनतीचेही फळ मिळाले आहे.
- अथर्व कुलकर्णी