औसा तालुक्यातील टाका येथील रहिवासी असलेल्या पूजा कदम यांचे वडील सेवानिवृत्त शिक्षक. त्यांना चार मुली. त्यात मोठी मुलगी जयश्री एम.एस. असून त्या जर्मनीमध्ये स्थायिक झाल्या आहेत. दुसरी मुलगी पल्लवी एम.टेक, तिसरी पूनम ही एमबीबीएस एम.डी. आहे. तर कुटूंबात लहान असलेल्या पूजा यांनी कला शाखेतून एम.ए.चे शिक्षण घेत केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षेत यशाला गवसणी घातली आहे. प्राथमिक शिक्षण लातूरच्या शिवाजी विद्यालयात, माध्यमिक शिक्षण श्री केशवराज विद्यालयात व अकरावी, बारावी दयानंद महाविद्यालयात केली आहे. पुढे पुण्याच्या फर्ग्यूसन महाविद्यालयात बी.ए. झाल्यानंतर दिल्लीच्या इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठातून एम.ए.चे शिक्षण पूर्ण केले. संपूर्ण शिक्षण मराठी माध्यमातून घेत असताना त्यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाची तयारी सुुरु केली. दोनवेळा आयएएस मेन्समध्ये यश आले. पाच वेळेस प्रिलिम उत्तीर्ण झाल्या. तिस-या प्रयत्नात मात्र, त्यांनी दैदीप्यमान यश संपादन केले. सेवानिवृत्त शिक्षक असलेल्या वडिलांनी पूजाला नेहमीच प्राेत्साहन दिले. त्यांच्या तीनही बहिणी उच्च शिक्षित असून, घरात धाकटी असलेल्या पुजालाही इतर बहिणींनी स्पर्धा परीक्षेसाठी प्रेरणा देण्याचे काम केले.
आई, मामांनी दिली प्रेरणा...
शिक्षक असलेल्या अशोक कदम यांना चारही मुलीच. त्यांनी मुलींना उच्च शिक्षण दिले. शिक्षणासाठीच त्यांनी लातूरात घर केले. आई संध्याताई यांनी चारही मुलींना शिक्षणासाठी प्रेरणा दिली. मामा सतिश पाटील हे सेल्स टॅक्स इन्सपेक्टर आहेत. त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन चारही मुलींनी कठोर परिश्रम घेतले. आपआपल्या क्षेत्रात यशाला गवसणी घातली.