लातूर : पावसाच्या वाहत्या पाण्याचा शेती, पिण्यासाठी उपयोग व्हावा म्हणून सिंचन प्रकल्प आहेत. मात्र, गेल्या काही वर्षांत सिंचन प्रकल्पातील गाळ उपसा करण्यात आला नसल्याने पाणी साठवण क्षमता कमी झाली होती. त्यामुळे जिल्ह्यात गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार मोहीम राबविण्यात येत आहे. आतापर्यंत ६७ प्रकल्पांतून ३० लाख ४७ हजार ९४० घनमीटर गाळ उपसा करण्यात आल्याने ३१० कोटी लिटर जलसंचय वाढणार आहे.
जिल्ह्यात ८ मध्यम प्रकल्प, १३४ लघु प्रकल्प तसेच बॅरेजेस, तलाव आहेत. त्यामुळे जलसाठा होण्यास मदत होत असली तरी गेल्या काही वर्षांत प्रकल्पांत गाळ मोठ्या प्रमाणात साठला. दरम्यान, गतवर्षी वार्षिक सरासरीच्या तुलनेत केवळ ७३ टक्के पाऊस झाल्याने आणि यंदा उन्हाची अधिक तीव्रता असल्याने बहुतांश प्रकल्प मार्चअखेरपासून आटण्यास सुरुवात झाली. येत्या पावसाळ्यात प्रकल्पांची जलसंचय क्षमता वाढावी म्हणून गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार मोहीम जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर- घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभावीपणे राबविण्यास सुरुवात झाली.
शिरुर अनंतपाळात सर्वाधिक गाळ उपसा...शिरुर अनंतपाळ तालुक्यात घरणी आणि साकोळ मध्यम प्रकल्प आहेत. त्यामुळे मोहिमेअंतर्गत ९,३०,७५० घनमीटर असा सर्वाधिक गाळ उपसा या तालुक्यात झाला आहे. त्यापाठोपाठ रेणापुरात ५,५४,२१८ घनमीटर गाळ उपसा झाला आहे. सर्वात कमी गाळ उपसा निलंगा तालुक्यात झाला आहे.
जिल्हाधिकाऱ्यांनी दिली मोहिमेस गती...मेच्या मध्यावधीपर्यंत केवळ १० लाख घनमीटर गाळ उपसा करण्यात आला होता. दरम्यान, यंदाचा उन्हाळा गाळ उपसा करण्यासाठी अत्यंत उपयुक्त असल्याचे पाहून जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर- घुगे यांनी या मोहिमेस गती दिली. त्यांनी स्वत: जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पांना भेटी देऊन शेतकऱ्यांशी संवाद साधत गाळ उपसा करण्याचे आवाहन केले. त्यासाठी दोन दिवस गाळमुक्तीचे, लातूरच्या विकासाचे हा अनोखा उपक्रमही राबविला. त्यामुळे केवळ १५ दिवसांत २० लाख घनमीटर गाळ उपसा झाला आहे.
साडेसात हजार एकर जमीन सुपिक...योजना, लोकसहभागातून एकूण ३० लाख ४७ हजार घनमीटर गाळसा करण्यात येऊन तो शेतकऱ्यांनी आपल्या खडकाळ, कमी प्रतिच्या जमिनीवर टाकला. त्यामुळे जमिनीची सुपिकता वाढण्यास मदत झाली असून शेती उत्पादनात वाढ होणार आहे. त्याचबरोबर ३१० कोटी लिटर जलसंचय वाढणार आहे.
दुष्काळावर मात करण्यास मदत...जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर- घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली गाळमुक्त धरण मोहीम प्रभावीपणे राबविण्यात आली. त्यामुळे जमीन सुपिक होऊन शेतकऱ्यांच्या उत्पन्नात मोठी वाढ होणार आहे. त्याचबरोबर जलसंचय वाढणार असल्याने दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यास मदत होणार आहे. याशिवाय, विहीर, बोअरच्या पाणीपातळी वाढ होऊन शेतकऱ्यांना दुहेरी लाभ होणार आहे.- ए. एस. कांबळे, जिल्हा जलसंधारण अधिकारी.
३० लाख ४७ हजार घनमीटर गाळ उपसा...तालुका - गाळ उपसाअहमदपूर - ३,७४,२९९औसा - ४,८१,११४चाकूर - ७३,०५०देवणी - ६२,४२८जळकोट - ५०,३२१लातूर - १,४८,५८२निलंगा - २३,०००रेणापूर - ५,५४,२१८शिरुर अनं. - ९,३०,७५०उदगीर -३,५०,१७८एकूण - ३०,४७,९४०