लातूर : मोबाईल कंपन्याचे शो-रूम फोडून जवळपास दीड कोटींचा मुद्देमाल पळविल्याची घटना लातूरातील गांधी मार्केट परिसरात चैनसुख रोड, तापडिया मार्केटनजीक सोमवारी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास घडली होती. याबाबत गांधी चौक पोलिस ठाण्यात तब्बल तीन दिवसांनातर बुधवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी सांगितले, लातूर शहरातील मध्यवर्ती भागात असलेल्या बसस्थानकाच्या पाठिमागिल आणि गांधी चौक ठाण्याच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या गांधी मार्केट येथे असलेले 'बालाजी टेलिकॉम' सेंटरच्या शटरचे कुलूप तोडून, शटर उचकटून चोरट्यानी सोमवारी पहाटे तीन ते चार वाजण्याच्या सुमारास आत प्रवेश केला होता. दरम्यान, मोबाईल शो-रूममध्ये ठेवण्यात आलेली महागडी घड्याळे, विविध प्रकारचे मोबाईल, टॅब यासह इतर साहित्य आणि रोख12 हजार रुपये असा एकूण 1 कोटी 34 लाख 67 हजार 755 रुपयांचा मुद्देमाल चोरट्यानी लंपास केला. ही घटना सोमवारी सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास समोर आली. घटनास्थळी दुकान चालक, मालक आणि डीवायएसपी भागवत फुंदे आणि गांधी चौक ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रेमप्रकाश मकोडे यांच्यासह पोलिस पथकाने भेट देऊन पाहणी केली.
याबाबत गांधी चौक पोलिस ठाण्यात संजयकुमार दिलीपकुमार गिल्डा यांनी दिलेल्या तक्रारीनुसार बुधवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशी माहिती पोलिस निरीक्षक प्रेमप्रकाश मकोडे यांनी दिली.