वलांडी (लातूर ) : देवणी तालुक्यातील वलांडी येथे कृषिपंपाचा वीजपुरवठा सुरळीत करावा, या मागणीसाठी मंगळवारी शेतकऱ्यांच्या वतीने महावितरण कार्यालयासमोर धरणे आंदाेलन करण्यात आले. जोपर्यंत विद्युत पुरवठा सुरळीत करणार नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याचा इशारा देताच कृषिपंपाचा वीजपुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन देण्यात आले.
वलांडी येथील महावितरण कार्यालयासमोर शेतकरी संघटनेच्यावतीने साेमवारी ठिय्या आंदोलन करण्यात आले. महावितरणने बोंबळी, टाकळी, बोंबळी खु., हेंळब, धनेगाव, अनंतवाडी, जवळगा, कोरेवाडीसह सुमारे ६० रोहित्रांचा वीजपुरवठा खंडित केला होता. त्यामुळे शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजकुमार सस्तापुरे याच्या नेतृत्वात ठिय्या आंदोलन करण्यात आले. यावेळी परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
याप्रसंगी उपकार्यकारी अभियंता देवणी, कनिष्ठ अभियंता वलांडी यांनी यापुढे पूर्व कल्पना न देता वीजपुरवठा खंडित करणार नाही, सक्तीची वीजबिल वसुली करण्यात येणार नाही, खंडित केलेला वीजपुरवठा सुरळीत करण्यात येईल असे आश्वासन दिल्यावर आंदोलन माघे घेण्यात आले. यावेळी सुरेंद्र आंबुलगे, रामराव मेळकुंदे, विनायक पाटील, नारायण बंग, सोपान चेन्नेवार, सोमेश्वर हुरसनले, राजाराम पाटील, बालाजी भोसले, सतीष भोसले, प्रशांत महाजन, तानाजी भंडे, अरुण पाटील, व्यंकट शिंदे आदींसह परिसरातील शेतकऱ्यांची उपस्थिती होती.