लातूर : विशेष मोहिमेंतर्गत विशेष पोलीस पथकाने बुधवारी सायंकाळी देवणी हद्दीतील इस्लामवाडी येथे छापा मारून एका वाहनासह ११० देशी दारूचे बॉक्स असा एकूण ८ लाख ६९ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी देवणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून, दोघांपैकी एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. वलांडी ते इस्लामवाडी जाणाऱ्या रस्त्यालगत गायरान जमिनीतील मोकळ्या जागेत दोघेजण विनापरवाना बेकायदेशीररित्या देशी दारूची विक्री करत असल्याची गुप्त माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे विशेष पथकातील पोलिसांनी बुधवारी रात्री याठिकाणी छापा मारला. या छाप्यामध्ये वाहनचालक कृष्णा तानाजी मुराळे (२५, रा. गुरधाळ, ता. देवणी) हा स्वत:च्या फायद्यासाठी अनधिकृतरित्या विनापरवाना देशी दारूची चोरटी विक्री करत असल्याचे निदर्शनास आले. वाहनातून देशी दारूचे बॉक्स उतरवत असताना तो पोलिसांना सापडला. यावेळी पांडुरंग शिवाजी बिरादार (रा. इस्लामवाडी) हा अंधाराचा फायदा घेऊन पळून गेला. दरम्यान, पोलिसांनी कृष्णा तानाजी मुराळे याच्या ताब्यातून असली धार संत्रा, सुपर संत्रा, सुप्रीम देशी दारू अशा वेगवेगळ्या कंपनीच्या १८० मि. ली.च्या ५ हजार २८० बाटल्या किंमत ३ लाख ६९ हजार ६०० रुपये व वाहतूक करण्यासाठी वापरात येणारे वाहन असा एकूण ८ लाख ६९ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याबाबत देवणी पोलीस ठाण्यात कलम ६५ (अ) (ई), ८१, ८३ महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमाप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास देवणी पोलीस करत आहेत.
अवैध दारूची चोरटी विक्री; ८ लाख ६९ हजारांचा मुद्देमाल जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2021 4:12 AM